Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा येतोय चुलबुल पांडे! सलमान खानचा 'दबंग ४' लवकरच, अरबाज खानने दिली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:09 IST

निर्माता दिग्दर्शक अरबाज खानने दबंग ४ बद्दल महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना खूप आनंद झाला आहे

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) याची 'दबंग' (Dabangg) ही फ्रेंचायझी खूपच सुपरहिट ठरली आहे. या सिरीजचे आतापर्यंत तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. २०१९ मध्ये 'दबंग ३' प्रदर्शित झाल्यापासून, चाहते 'दबंग ४' ची आतुरतेने वाट पाहत होते.

आता या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेता-निर्माता अरबाज खानने 'दबंग ४' ची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. याचा अर्थ 'चुलबुल पांडे' पुन्हा एकदा त्याच्या खास 'दबंग' अंदाजात मोठ्या पडद्यावर धमाल करताना दिसणार आहे.

अरबाज खानने केली पुष्टी

झूमला दिलेल्या एका मुलाखतीत, अरबाज खानने स्पष्ट केले की, 'दबंग ४' चित्रपटावर काम सुरू आहे. तथापि, 'दबंग'च्या टीमला हा चित्रपट लवकर प्रदर्शित करण्याची कोणतीही घाई नाही. अरबाज खान म्हणाला, "चित्रपट आम्ही करणार हे निश्चित, पण शूटिंग कधी सुरु होणार, याबद्दल मला माहीत नाही. 'दबंग'च्या पुढील भागाबद्दल वारंवार प्रश्न विचारला जातो, म्हणून हे माझे ठरलेले उत्तर आहे, कारण 'दबंग ४ कधी येणार?' हा सगळ्यांचा पेटंट प्रश्न असतो'', असं तो गंमतीने म्हणाला.

अरबाज पुढे म्हणाला, "आम्ही यावर काम करत आहोत आणि कोणतीही घाई नाही. पण ही अशी गोष्ट आहे, ज्यावर सलमान आणि आम्ही दोघे चर्चा करून नक्कीच चित्रपट बनवणार आहोत. हा चित्रपट नक्कीच येईल. कधी येईल हे माहीत नाही, पण जेव्हाही येईल, तेव्हा त्याची उत्सुकता सर्वांना असेल."

'दबंग' फ्रेंचायझीविषयी

'दबंग' या फ्रेंचायझीची सुरुवात २०१० मध्ये झाली. अभिनव कश्यप यांनी दिग्दर्शित केलेल्या या पहिल्या चित्रपटात सलमान खानने पोलीस अधिकारी 'चुलबुल पांडे'ची आयकॉनिक भूमिका साकारली. ॲक्शन, कॉमेडी आणि ड्रामा यांचा जबरदस्त मेळ असलेल्या या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने 'रज्जो'ची भूमिका केली होती. हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या मसाला मनोरंजक चित्रपटांपैकी एक ठरला. यानंतर, २०१२ मध्ये 'दबंग २' प्रदर्शित झाला, ज्याचे दिग्दर्शन अरबाज खान यांनी केले होते. २०१९ मध्ये आलेल्या 'दबंग ३' चे दिग्दर्शन प्रभु देवा यांनी केले होते.

सलमान खानचे आगामी प्रोजेक्ट्स

सध्या सलमान खान टीव्हीचा लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस १९' होस्ट करत आहे. याव्यतिरिक्त, तो अपूर्व लाखिया दिग्दर्शित आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २०२० मध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अरबाज खानने 'दबंग ४' ला हिरवा कंदील दाखवल्यामुळे, आता चाहत्यांना 'चुलबुल पांडे' पुन्हा कधी पडद्यावर दिसतो, याची प्रतीक्षा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chulbul Pandey Returns! Salman Khan's 'Dabangg 4' Confirmed by Arbaaz Khan

Web Summary : Salman Khan's 'Dabangg 4' is officially happening! Arbaaz Khan confirmed the news, stating that while there's no rush, the team is actively working on the script. Chulbul Pandey will return, promising action and entertainment. Release date is yet to be announced.
टॅग्स :सलमान खानअरबाज खानबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार