Join us

खांद्यावर तोफ अन् डोळ्यात अंगार! स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर 'बॉर्डर २'च्या रिलीज डेटची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 11:25 IST

सनी देओलच्या आगामी 'बॉर्डर २' सिनेमाचं खास पोस्टर आज सर्वांसमोर आलं आहे. इतकंच नव्हे 'बॉर्डर २'च्या रिलीजची घोषणाही झाली आहे

आज स्वातंत्र्यदिनानिमित्त बहुचर्चित ‘बॉर्डर २’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता सनी देओल फौजी गणवेशात, खांद्यावर तोफ घेऊन, ठाम आणि जोशपूर्ण नजरेनं उभा आहे. पार्श्वभूमीत तिरंगा आणि रणांगणाचं वातावरण दिसतंय. स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर प्रथमच ‘बॉर्डर २’मधील सनी देओलचा लूक समोर आला आहे. पोस्टरसोबत निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. जाणून घ्या

‘बॉर्डर २’च्या रिलीजची घोषणा

‘बॉर्डर २’ हा १९९७ साली प्रदर्शित झालेल्या हिट चित्रपट ‘बॉर्डर’चा सीक्वल आहे. पहिल्या भागात जसं युद्धातील शौर्य आणि सैनिकांच्या त्यागाचं चित्रण झालं होतं, तसंच भावनिक आणि देशभक्तीचं वातावरण या नव्या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक अनुराग सिंह यांनी सांगितलं की, स्वातंत्र्यदिनानिमित्त हे पोस्टर जाहीर करणं हा एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण आहे, कारण हा दिवस देशासाठी लढलेल्या वीरांची आठवण करून देतो. २२ जानेवारी २०२६ रोजी 'बॉर्डर २' हा सिनेमा रिलीज होणार आहे.

‘बॉर्डर २’ या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, तसेच मेधा राणा, मोना सिंग आणि सोनम बाजवा यांच्याही भूमिका आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट केवळ युद्धावर आधारित नसून सैनिकांच्या भावनांचा, त्यांच्या कुटुंबाच्या त्यागाचा आणि देशासाठी असलेल्या निष्ठेचा सशक्त संदेश देणारा चित्रपट आहे. देशभक्ती, नाट्यमयता आणि थरारक युद्ध दृश्यं यांचा संगम यात पाहायला मिळेल.

टॅग्स :सनी देओलदिलजीत दोसांझवरूण धवनअहान शेट्टीबॉलिवूडस्वातंत्र्य दिन