Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 11:08 IST

मराठी-हिंदी गाणी गाऊन प्रसिद्ध झालेला गायकाने २ वर्षांपूर्वी आवाज गमावला. आता कशी आहे तब्येत?

बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातही लोकप्रिय गाणी गाणाऱ्या गायकाने २ वर्षांपूर्वी त्याचा आवाज गमावल्याचा खुलासा त्याने केलाय. हा गायक म्हणजे शेखर रवजियानी.(shekhar ravjiyani) शेखरने मराठीमध्ये 'साजणी', 'हरवली पाखरे' ही लोकप्रिय गाणी गायली. परंतु शेखरने नुकतंच एक खुलासा केला त्यामुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. शेखरने दोन वर्षांपूर्वी त्याचा आवाज गमावला होता. यामुळे त्याचं करिअर संपेल, अशी त्याला भीती होती. शेखरने नुकतंच याविषयी खुलासा केला.

शेखरने गमावलेला आवाज अन् पुढे...

शेखरने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, "मी याआधी कधीही या विषयावर बोललो नाही. दोन वर्षांपूर्वी माझा आवाज मी गमावला होता. हा खूप भीतीदायक अनुभव होता. मला वाटलेलं की मी पुन्हा कधी गाऊ शकणार नाही. हा खूप कठीण काळ होता. कारण माझ्या कुटुंबाला माझी काळजी वाटत होती. त्यानंतर मी या आजारावर मात करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली. शेखरने कॅलिफोर्नियामधील डॉक्टरांची यासाठी मदत घेतली. कोविड असल्याने झूम कॉलच्या माध्यमातून मी उपचार घेत होतो."

शेखर पुढे म्हणाला की,"डॉक्टरांच्या मदतीने आवाज सुधारण्यासाठी मी प्रयत्न करायला सुरुवात केली. आवाज ठीक करण्यासाठी कोणताही मार्ग आता माझ्याकडे नाही असं मला सुरुवातीला वाटलेलं. पण डॉक्टर एरिन यांनी माझा आत्मविश्वास परत आणला. जेव्हा मी डॉक्टरांना विचारलं की मी पुन्हा गाऊ शकतो का? तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं. पुढे डॉक्टरांच्या मदतीने माझा आवाज हळूहळू बरा व्हायला लागला."

आता शेखरच्या आवाजाबद्दल काय अपडेट्स?

शेखरने पोस्टमध्ये शेवटी लिहिलं की, "जेव्हा मी पुन्हा गाण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझा आवाज थोडा फाटल्यासारखा आला. त्यामुळे मी स्वतःच्या आवाजावर नाराजी प्रकट केली. पण पुढे डॉक्टरांची मदत घेऊन हळूहळू मी माझ्या आवाजाला ठीक केलं. व्हॉईस थेरपी घेण्याची प्रक्रिया पुढे काही दिवस सुरु असणार आहे. काही आठवड्यांनी माझा आवाज आधीसारखा होईल. हा अनुभव माझ्यासाठी मोठा धडा होता. जो मला कायम लक्षात राहील."

टॅग्स :बॉलिवूड