Join us

बॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ गीतकाराचे झाले निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 18:20 IST

कहीं दूर कभी दिन ढल जाएँ, जिंदगी कैसी है ये पहेली यांसारखी अजरामर गीते त्यांनी बॉलिवूडला दिली.

ठळक मुद्देआनंद, रजनीगंधा यांसारख्या चित्रपटांना सुपरहिट गाणी देणाऱ्या गीतकार योगेश गौर यांचे आज निधन झाले. इंडस्ट्रीत त्यांना योगेश या नावानेच सगळे ओळखत असत. ते ७७ वर्षांचे होते.

आनंद, रजनीगंधा यांसारख्या चित्रपटांना सुपरहिट गाणी देणाऱ्या गीतकार योगेश गौर यांचे आज निधन झाले. इंडस्ट्रीत त्यांना योगेश या नावानेच सगळे ओळखत असत. ते ७७ वर्षांचे होते. आनंदमधील त्यांनी लिहिलेले कहीं दूर कभी दिन ढल जाएँ चाँद सी..., जिंदगी कैसी है ये पहेली ही गाणी आजही प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात आहे. त्यांनी सत्तर, ऐंशीच्या दशकात अनेक प्रसिद्ध निर्मात्यांसोबत काम केले.

भारतीय गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्वीटरद्वारे योगेश यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, मला आताच कळलं मनाला स्पर्श करणारे गीत लिहिणारे प्रसिद्ध गीतकार योगेश यांचे निधन झाले. हे ऐकून मला प्रचंड दुःख वाटले. त्यांनी लिहिलेली अनेक गाणी मी गायली आहेत. ते खूपच शांत आणि अतिशय चांगल्या स्वभावाचे होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो...

योगेश यांनी गीतकार म्हणून सखी रोबिन या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांनी सहा गाणी लिहिली होती. त्यांनी छोटी सी बात, बातो बातो में मंजिल, मिली यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगली गाणी लिहिली. सनम वेबफा हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यांनी हृषिकेष मुखर्जी आणि बासू चॅटर्जी यांच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती. 

टॅग्स :बॉलिवूड