बॉलिवूड क्षेत्रातून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे निधन झालं. अभिनेते अनुपम खेर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. ४५ वर्षांच्या मैत्रीवर अखेर पूर्णविराम लागला. त्यांच्याशिवाय आपलं जीवन पूर्वीप्रमाणे नसेल, असं अनुपम खेर म्हणाले.वयाच्या ६७ व्या वर्षी सतीश कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी याची पुष्टी केली आहे. "मृत्यू हे या जगातील अंतिम सत्य आहे. पण मी माझ्या हयातीत हे आपले खास मित्र सतीश कौशक यांच्याबद्दल लिहिन याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. ४५ ववर्षांच्या मैत्रीवर अचानक पूर्णविराम. सतीश, तुझ्याशिवाय माझं जीवन पूर्वीप्रमाणे नसेल. ओम शांती," असं अनुपम खेर यांनी म्हटलंय.
१३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणाच्या महेंद्रगड येथे जन्मलेल्या सतीश कौशिक यांनी १९८३ मध्ये आलेल्या 'जाने भी दो यारों' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. १९९३ मध्ये 'रूप की रानी चोरों का राजा' या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाच्या जगतात पाऊल ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केले. सतीश कौशिक यांनी प्रत्येक जॉनरमध्ये काम केलं.
एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच ते स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते. मिस्टर इंडिया या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. राम लखन, साजन चले ससुराल अशा अनेक चित्रपटात त्यांनी अभिनय साकारला आहे. ते लवकरच कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात झळकणार होता. काही काळापूर्वी त्यांचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता.