Sonakshi Sinha:बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha). आपल्या आजवरच्या फिल्मी कारकिर्दीमध्ये अभिनेत्रीने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.सोनाक्षी तिच्या करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. लवकरच ती निकिता रॉय या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या अभिनेत्री या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचदरम्यान, केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नुकताच सोनाक्षी सिन्हाने 'निकिता रॉय' च्या प्रमोशन इव्हेंटदरम्यान, तिच्यासोबत घडलेल्या एका भयावह घटनेचा किस्सा शेअर केला. आश्चर्याची बाब म्हणजे ही घटना सोनाक्षीसोबत तिच्याच राहत्या घरात घडली. या घटनेमुळे तिला धक्काच बसला होता. त्याबद्दल सांगताना सोनाक्षी म्हणाली, " खरंतर माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. पण एका रात्री माझ्या राहत्या घरात माझ्यासोबत अशी विचित्र घटना घडली ज्यामुळे मला अशा गोष्टींची भीती वाटू लागली. परंतु त्यानंतर पुन्हा तसं काही घडलं नाही त्यामुळे मला असं वाटतं ते स्वप्न असावं."
नेमकं काय घडलं? पुढे त्या भयावह घटनेबद्दल सांगताना सोनाक्षी म्हणाली, तेव्हा मी झोपले होते. असं असतं ना की झोपेत असताना तुमचे डोळे फक्त बंद असतात आणि बाकी तुम्ही शुद्धीत असता. तसंच काहीसं माझ्याबाबतीतही घडलं होतं. त्यावेळी जवळपास ४ वाजले होते मला माहित नाही ते एक स्वप्न होतं की आणखी काही होतं. पण तेव्हा कोणीतरी मला झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न करत आहे, असं वाटलं. मी प्रचंड घाबरले. शिवाय तेव्हा मी डोळे देखील उघडले नाही. त्या अनुभवाने मला आतून हादरवून टाकलं. असं भुताटकीचा अनुभव सोनाक्षीने चाहत्यांसोबत शेअर केला.