Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला भीती...", पद्मिनी कोल्हापूरेंनी सांगितला ऋषी कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव,नेमकं काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:21 IST

"मी खूप घाबरले होते, कारण...",पद्मिनी कोल्हापूरेंनी सांगितला ऋषी कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या-"संपूर्ण शूटिंगदरम्यान..."

Padmini Kolhapure: ८०-९० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे पद्मिनी कोल्हापूरे. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांचा सिनेसृष्टीतील आजवरचा प्रवास समृद्ध करणारा आहे.त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, पडद्यावर ऋषी कपूर आणि त्यांची जोडी चांगलीच गाजली. या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. पद्मिनी अनेकदा ऋषी कपूर यांच्या आठवणी सांगत असतात. नुकताच पद्मिनी कोल्हापूरे  यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.


दरम्यान, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे इंडियन आयडॉलच्या आगामी एपिसोडमध्ये हजेरी लावणार आहेत.याचा एक प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे. या प्रोमोमध्ये त्या त्यांच्या काही चित्रपटांच्या आठवणी शेअर करताना दिसत आहेत.यावेळी पद्मिनी यांनी त्यांच्या  पूछो ना यार क्या हुआ है... या गाण्याच्या शूटिंगचे काही मजेशीर किस्से सांगितले. या शोमध्ये त्या म्हणाल्या, एक लीड अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली, हा प्रवास माझ्यासाठी खास होता. मग पुढे ऋषी कपूर यांची आठवण सांगताना पद्मिनी म्हणाल्या,ऋषी कपूर यांच्यासोबत नायिका म्हणून प्रमुख भूमिकेत काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. या गाण्यात माझ्यासोबत ऋषी कपूर होते,त्या काळी ऋषी कपूर यांची गणना  इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांमध्ये केली जायची.

यानंतर ऋषी कपूर यांच्यासोबत रोमॅन्टिक गाण्यात काम करण्याचा अनुभ शेअर करताना त्यांनी म्हटलं, "त्या दिवशी मी ऋषी कपूर यांच्यासोबत रोमॅन्टिक गाण्याचं शूट करताना खूप घाबरले होते.त्यांच्याबरोबर काम करताना माझ्याकडून कोणतीही चूक होऊ नये अशी मला भीती वाटत होती, पण ऋषी कपूर यांनी मला खूप चांगली वागणूक दिली. त्यामुळे माझी सगळी भीती हळूहळू नाहीशी झाली. त्यांनी मला अवघडलेपणा वाटू दिला नाही आणि संपूर्ण शूटिंगदरम्यान त्यांनी माझी काळजी घेतली."

अभिनेत्री पुढे म्हणाली, "हे गाणे 'नसीब' चित्रपटातील असून त्याचं शूटिंग ऊटीमध्ये झालं होतं. हे गाणे खास बनवण्यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली. इतकी वर्षे उलटूनही लोकांना ते आजही आवडते. चित्रपटातील 'होगा तुमसे प्यारा कौन' आणि 'जमाने को दिखाना है' ही इतर गाणीसुद्धा आजही लोकांच्या मनात खोलवर रुजलेली आहेत." असं म्हणत त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

यादरम्यान, पद्मिनी यांनी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्याबद्दलही वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, "आशा भोसले प्रत्येक गाण्यातील भावना पूर्णपणे समजून घ्यायच्या. रेकॉर्डिंग करण्यापूर्वी, अभिनेत्री गाण्यात कोणत्या प्रकारच्या भावना व्यक्त करत आहे हे समजून घेण्याचा त्या प्रयत्न करायच्या आणि जेव्हा त्या गायच्या, तेव्हा लोकांना असे वाटायचे की पडद्यावरील अभिनेत्री स्वतःच ते गाणे गात आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Padmini Kolhapure recalls fear, experience of working with Rishi Kapoor.

Web Summary : Padmini Kolhapure shared her experiences working with Rishi Kapoor, revealing initial fear during a romantic song shoot for 'Naseeb' in Ooty. Kapoor's supportive nature eased her nervousness. She also praised Asha Bhosle's ability to capture emotions in songs.
टॅग्स :पद्मिनी कोल्हापुरेऋषी कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा