Join us

दिलदार मनाची..! बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या ड्रायव्हरचंही भविष्य घडवलं, ५० लाख दिलेच शिवाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:01 IST

सध्याच्या आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीने तिचा ड्रायव्हर आणि घरात काम करणाऱ्या मदतनीसाचं आयुष्य सेट केलं आहे. काय केलं या अभिनेत्रीने

बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत जे आपल्यासोबत काम करणाऱ्या स्टाफची चांगली काळजी घेतात. त्यांना आदराने आणि प्रेमाने वागवतात शिवाय त्यांची आर्थिक मदतही करतात. हा किस्सा अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीचा. या अभिनेत्रीने चक्क तिच्या स्टाफला ५० लाख रुपये दिले आहेत. ही बॉलिवूड अभिनेत्री आहे आलिया भट. आलिया तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच दिलदार स्वभावासाठीही ओळखली जाते. आलियाच्या अशाच दिलदार कृतीमुळे ती चर्चेत आहे. काय केलं आलियाने? जाणून घ्या.

आलियाने स्टाफला दिले ५० लाख रुपये 

 मीडिया रिपोर्टनुसार आलियाने तिचा ड्रायव्हर आणि घरकाम करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकी ५० लाख रुपये दिले. या दोघांनाही स्वतःचं घर घ्यायचं होतं. त्यामुळेच आलियाने या दोघांना प्रत्येकी ५० लाखांची मोठी मदत केली आहे. ही खास घटना २०१९ साली घडली. त्यावेळी आलिया तिचा २६ वा वाढदिवस साजरा करत होती. आलियाच्या करिअरच्या सुरुवातीपासून तिच्या घरचा मदतनीस आणि ड्रायव्हर तिच्यासोबत काम करत आहेत. त्यांचंही आयुष्य स्थिरस्थावर आणि सुरळीत व्हावं म्हणून आलियाने दोघांना ५० लाखांची मदत केली आहे. 

दोघांनी पैशातून मुंबईत केलं घर बूक

आलियाने दिलेल्या पैशातून या दोघांनी मुंबईत स्वतःचं घर बूक केल्याचं सांगण्यात येत आहे. आलियाने या गोष्टीची कुठेही मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली नाही. अत्यंत खाजगी पद्धतीने आलियाने ही  कृती केली. तिच्या या कृत्यामुळे अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांबद्दल तिच्या मनात असलेला आदर आणि आपुलकी यातून स्पष्ट दिसते. आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सध्या YRF पिक्चरसोबत आगामी 'अल्फा' सिनेमासाठी काम करत आहे. हा सिनेमा डिसेंबर २०२५ मध्ये भेटीला येण्याची शक्यता असून यात आलियासोबत शर्वरी वाघ झळकणार आहे.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडरणबीर कपूर