Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) त्याचा आगामी चित्रपट 'बेबी जॉन'मुळे (Baby John) चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवनसोबत साउथ क्वीन किर्ती सुरेशसह वामिका गब्बी महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या अभिनेता वरुण धवन 'बेबी जॉन'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यादरम्यान तो वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वरुण धवनने 'बेबी जॉन' चित्रपटासंबंधी खास किस्से शेअर केले. त्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने सांगितलं की, 'बेबी जॉन' मध्ये डबल रोल साकारताना त्याला अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट सिनेमा 'हम' पासून प्रेरणा मिळाली, असं त्याने सांगितलं. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला, "मला 'हम' चित्रपट खूपच आवडला. या चित्रपटात रजनीकांत सर, गोविंदा यांसारखे कलाकार पाहायला मिळाले. शिवाय माझे आवडते दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांचा हा चित्रपट पाहून त्यांच्या दुरदृष्टीचा अंदाज येतो. हम मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने अमिताभ बच्चन यांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ दाखवला त्यांची ती कल्पना मला भावली."
पुढे अभिनेत्याने म्हटलं की. 'बेबी जॉन' त्याच्या करिअरमधील असा सिनेमा आहे जो त्याच्यासाठी भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरला. "या चित्रपटामध्ये असेही काही सीन्स आहेत जे करत असताना मी भावुक झालो. त्यावेळी दिग्दर्शक कलीस सर यांनी मला शूट करताना भावुक व्हायचं नाही, अशी सक्त ताकीद दिली होती. पण कधी कधी मी तर अक्षरश: सेटवर रडायचो." असा खुलासा वरुण धवनने केला.