Join us

अक्षय कुमारला पहिल्यांदा पाहिल्यावर घाबरलेला सुनील शेट्टी; असं काय घडलेलं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 11:14 IST

"तेव्हा असं वाटलं...", सुनील शेट्टीला 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत काम करायला वाटायची भीती; कारण काय? 

Suniel Shetty: सुनील शेट्टी (Suniel Shetty) हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. विनोदी असो किंवा गंभीर भूमिका असो सुनील शेट्टीने त्या पडद्यावर उत्तमरित्या साकारुन प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं. सध्या अभिनेता त्याचा आगामी चित्रपट 'केसरी वीर' मुळे चर्चेत आहे. लवकरच या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, सुनील शेट्टीने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले, शिवाय बऱ्याच कलाकारांसोबत काम केलं. पण त्याची आणि अक्षय कुमारची (Akshay Kumar) जोडी हिट झाली. अशातच आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने अक्षय कुमारसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला आहे. 

अलिकडेच  'रेडिओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीने अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीचे अनेक किस्से शेअर केले. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला, "मी अक्षय सोबतची ती पहिली भेट कधीच विसरु शकत नाही. कारण, माझा एक चुलत भाऊ होता ज्याचं नाव उल्लास असं होतं. त्यानेच माझे पहिल्यांदा फोटो पाठवले आणि मला मॉंडेलिंगचं असायनमेंट मिळालं. पण एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. तो जवळपास २७-२८ वर्षांचा होता."

त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला, "जेव्हा मी अक्षय कुमारला पाहिलं तेव्हा क्षणभर मला असं वाटलं की त्याची देहबोली अगदी तशीच आहे. क्लीन शेव, देखणा आणि उंच तो अगदी माझ्या भावासारखा दिसायचा. मी अक्षयला भेटल्यानंतर पहिली गोष्ट सांगितली की, तू मला माझ्या भावाची आठवण करून देतोस, जो मी अपघातात गमावला होता."

अक्षयसोबत काम करताना सुनील शेट्टी का घाबरला?

या घटनेबद्दल बोलताना सुनील शेट्टी म्हणाला, "मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की, मला दररोज तुझ्यासोबत काम करावं लागणार आहे, ते माझ्यासाठी खूप भीतीदायक आहे. कारण जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा मला माझ्या चुलत भावाची आठवण येते आणि अगदी तसंच घडलं. एका रात्री आम्ही बराच वेळ एकत्र बसलो तेव्हा सगळं त्याने सहज सांभाळून घेतलं. या जगात अक्षयपेक्षा जास्त मजा करणारा दुसरा कोणी नाही." असा खुलासा अभिनेत्याने केला. 

दरम्यान, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांनी 'हेरा फेरी', 'फिर हेरा फेरी', 'मोहरा', 'धडकन' आणि 'पहचान' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतलं होतं. आता लवकरच सुनील शेट्टी 'केसरी वीर' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय आणि सूरज पांचोली मुख्य भूमिकेत आहेत. येत्या २३ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

टॅग्स :सुनील शेट्टीअक्षय कुमारबॉलिवूडसिनेमा