बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानबद्दल एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. शाहरुख खानला दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे. शाहरुख सध्या त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखला दुखापत झाली आहे. मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये एका अॅक्शन सीनचं चित्रीकरण करत असताना शाहरुखच्या हाडांना जबरदस्त ताण आला. शाहरुखला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला किमान एक महिन्याची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
शाहरुखला कशी झाली दुखापत?
शाहरुखला झालेल्या या दुखापतीमुळे 'किंग' चित्रपटाचं शूटिंगला तात्पुरतं थांबलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून, यात शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान आणि अभिनेता अभिषेक बच्चन देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शाहरुख खानला याआधीही वेगवेगळ्या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान दुखापती झाल्या आहेत, पण तो कधीही कामात खंड पडू देत नाही. मात्र यावेळी दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिल्यामुळे अभिनेत्याला ब्रेक घ्यावा लागत आहे. ‘किंग’ चित्रपटाचं पुढचं शूटिंग ऑगस्टमध्ये युरोपमध्ये पार पडणार आहे.
ही बातमी समोर येताच अभिनेत्याच्या चाहत्यांना आता त्याच्या तब्येतीबाबत चिंता वाटू लागली आहे. शाहरुखच्या जवळच्या सूत्रांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या माहितीनुसार असं सांगण्यात आलंय की, ही गंभीर दुखापत नाही. पण शाहरुखला विश्रांतीची गरज आहे आणि काही दिवसांत तो पुन्हा फिट होऊन शूटिंग करायला परत येईल. शाहरुख खानच्या या दुखापतीमुळे 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगला थोडा विलंब झाला असला, तरी चाहते त्याच्या दमदार कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहेत. किंग या चित्रपटाचा विषय अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात शहरुख, सुहाना, अभिषेक बच्चनसोबत जयदीप अहलावत सुद्धा खास भूमिकेत आहे.