बॉलिवूड अभिनेता साहिल खानने दुसरं लग्न ( Sahil Khan marries Milena Aleksandra) केलं आहे. दुबईतील बुर्ज खलिफा येथे लग्झरी वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये कपलचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. अभिनेत्यानं मिलेना अलेक्झांड्राशी लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे मिलेना आणि साहिलमध्ये १, २ नाही तर २६ वर्षांचे अंतर आहे. या जोडप्याच्या फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचबरोबर त्याचे चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत.
साहिल खानची नवी वधू मिलेना हिने लग्झरी वेडिंग रिसेप्शनसाठी रॉयल लूक केला होता. तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. ज्यामध्ये ती राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हती.तर साहिल खान काळ्या सूटमध्ये डॅशिंग लूकमध्ये दिसला. साहिल ४८ वर्षांचा आहे, तर मिलिना फक्त २२ वर्षांची आहे. ती बेलारूस (युरोप) ची रहिवाशी आहे. या दोघांनी रिसेप्शनमध्ये 6 टियर केक कापला. केक कापतानाचा व्हिडीओ साहिलने पोस्ट केला आहे.
अभिनेत्यानं हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "ती खूप हुशार आहे, पण त्याचबरोबर ती संवेदनशीलही आहे. कारण ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे. पण ती तिच्या वयाच्या इतर मुलींच्या तुलनेत अधिक मोठी आणि शांत आहे". साहिल खानने 'स्टाईल' आणि 'एक्सक्यूज मी' सारख्या हिट चित्रपटांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. साहिल आता अभिनयापासून दूर आहे. तर तो फिटनेस इंडस्ट्रीमधील एक मोठा उद्योगपती बनला आहे. दरम्यान, साहिलच्या पहिल्या लग्नाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने अभिनेत्री नेगर खानशी लग्न केलं होतं. पण २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.