Bhool Chuk Maaf Day 1 Box Office Collection: राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि वामिका गब्बी (Wamiqua Gabbi) यांची प्रमुख भूमिका असलेला 'भूल चूक माफ' हा चित्रपट मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत होता. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याची योजना आखली होती, परंतु पीव्हीआर आयनॉक्सने याला विरोध दर्शवला होता आणि ६० कोटींच्या नुकसानभरपाईसाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या वादानंतर अखेर काल २३ मे रोजी हा बहुचर्चित चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात आता रिलीजनंतर पहिल्याच दिवशी रसिकांनी भूल चूक माफ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी भूल चूक माफ चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे राजकुमार राव आणि वामिका गब्बीचा हा सिनेमा किती कमाई करेल याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यात आता या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, भूल चूक माफ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ६.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. लक्षवेधी बाब म्हणजे 'रेड २', 'मिशन इम्पॉसिबल' आणि 'फायनल डेस्टिनेशन' सारखे चित्रपट आधीच थिएटरमध्ये सुरू आहेत. या शर्यतीत राजकुमार रावच्या चित्रपटाने चांगली सुरुवात केली आहे.
करण शर्मा लिखित आणि दिग्दर्शित, ‘भूल चूक माफ’ या चित्रपटाचं कथानक दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहेत.