Bollywood Actor: हिंदी चित्रपटसृष्टी केव्हा कोणाचं नशीब उजळेल वा कोणाला कधी अंधारात लोटेल याचा कधीही अंदाज येत नाही. या सिनेसृष्टीने अनेकांना ओळख मिळवून दिली. असाच एक अभिनेता ज्याची एक झलक जरी रुपेरी पडद्यावर दिसली तर त्याने साकारलेली पात्रं डोळ्यासमोर उभी राहतात. हा अभिनेता म्हणजे महेश आनंद. 'शहंशाह', 'हथियार', 'मुजरिम' आणि 'तूफान' यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने नकारात्मक भूमिका साकारून या नायकाने सिनेरसिकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. त्याने साकारलेल्या अनेक खलनायकी भूमिकातून त्याने आपल्या अभिनयाची जादू सिनेरसिकांना दाखवली. मात्र,महेश आनंद त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिला.
५ लग्न अन् डेटिंग लाईफ चर्चेत
महेश आनंद यांच्या लव्ह लाईफबद्दलही बरीच चर्चा झाली होती . महेश यांनी एकामागून एक पाच लग्न केली. त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री रीना रॉयची बहीण बरखा रॉय यांच्यासोबत झालं होतं.त्यानंतर,त्यांनी मिस इंडिया इंटरनॅशनल मारिया एरिका डिसूझाशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यांनी १९९२ मध्ये मधु मल्होत्रासोबत तिसरं लग्न केलं आणि त्यानंतर २००० मध्ये अभिनेत्री उषा बचानीसोबत चौथे लग्न केलं, मात्र हे नातं देखील टिकू शकलं नाही. अखेरीस त्यांनी एका रशियन महिलेशी पाचव्यांदा संसार थाटला. पण, हाती काम नसल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्याकडे शेवटच्या क्षणी पाणी विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते. शेवटचे ते 'रंगीला राजा' या चित्रपटात दिसले.
अनंत अडचणींनी भरलेलं आयुष्य सावरत महेश आनंद याचा प्रवास काट्यांवर चालण्यासारखा होता. यशस्वी कारकिर्दीनंतरही त्याचा शेवट हा वेदनादायी झाला. अखेरच्या क्षणी कुटुंबीयांनीही साथ सोडली होती.वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.अभिनेत्याच्या मृत्यूनंतरही फेसबुकवर काही मेसेज सापडले ज्यामध्ये त्यांना मुलाला भेटण्याची आस लागली होती, असं म्हटलं जातं.