सध्या बॉलिवूडमध्ये अॅक्शनपटांची सध्या चलती आहे. अनेक अभिनेते कोणताही स्टंट डबल न वापरता स्वत: अॅक्शन सीन देतात. मात्र, काहीवेळेस त्यांना स्टंट डबलची गरज लागते. स्टंट डबल हा व्यक्ती एखादा अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या तत्सम उंची, रंग, रुपाशी मिळता जुळता असतो. या कामासाठी स्टंट डबलला चांगले पैसे आणि लोकप्रियता देखील मिळते. अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) याचे बहुतांश चित्रपट हे अॅक्शनने खचाखच भरलेले असतात. अनेकदा हृतिकच्या जागी त्याचा स्टंट डबल असतो. नुकतंच हृतिकच्या स्टंट डबलची ओळख समोर आली आहे.
जवळपास १५ वर्षांपासून हृतिकसोबत काम करणाऱ्या त्याच्या स्टंट डबलचे नाव मन्सूर अली खान आहे. मन्सूरने नुकताच हृतिकला मिठी मारतानाचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली. त्यात तो म्हणाला, "इंडस्ट्रीमध्ये १७ वर्षे घालवल्यानंतर, मला भारतातील अनेक प्रतिभावान कलाकारांसोबत स्टंट डबल म्हणून काम करण्याचा सौभाग्य मिळालं आहे. पण, हृतिक रोशनसारखी कोणीही माझ्या हृदयावर अमिट छाप सोडलेली नाही".
तो पुढे म्हणाला, "त्याचा दयाळूपणा, नम्रता आणि साधेपणा खरोखरच प्रेरणादायी आहे. त्याच्यासोबत काम करण्याच्या माझ्या १४-१५ वर्षांमध्ये मी त्याचे कामाबद्दलचे समर्पण पाहिले आहे". मन्सूरच्या या पोस्टला हृतिकनेही तेवढ्याच नम्रपणे उत्तर दिले. त्याने मन्सूरची पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले, "मन्सूर, मी तुझा खूप आभारी आहे. तू माझ्या आयुष्यात खूप योगदान दिले आहे". दरम्यान, हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो अलिकडेच 'वॉर २' या चित्रपटात दिसला. हृतिक रोशनची गणना बॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांमध्ये केली जाते. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते आहेत. हृतिकच्या नृत्याचे अनेक जण दिवाने आहेत. गेल्या २५ वर्षांपासून तो चित्रपटसृष्टीत यशस्वीरित्या काम करतोय.