Amol Prashar:बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांचं अफेअर्स आणि लिंक्डअपच्या चर्चा हा विषय काही नवा नाही. त्यात मागील काही दिवसांपासून अभिनेता अमोल पराशर हा कोंकणा शर्माला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. एका वेबसिरीजच्या स्क्रिनिंगदरम्यान, अमोल आणि कोंकणाला एकत्र पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. या अफवांवर आता अमोल पराशरने भाष्य केलं आहे. अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अमोल पाराशर यांच्यामध्ये ७ वर्षांचं अंतर आहे. गेल्या वर्षी अमोलने रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. पण, त्याने गर्लफ्रेंडचं नाव सांगितलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपविषयी चर्चा सुरु झाली होती.
दरम्यान, नुकतीच अभिनेत्याने टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने कोंकणा सेनसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांचं खंडण करत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी तो म्हणाला, " मला याबाबत काही बोलावसं वाटतच नाही. कदाचित यामुळे तुम्हाला माझा रागही येईल. पण, आता या विषयावर मी बोलू शकत नाही. याबद्दल आम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिली नसतानाही लोकांनी मतं बनवली."
पुढे अभिनेता म्हणाला, " त्यादरम्यान, स्क्रिनिंगवेळी माझे कुटुंबीय देखील सोबत होते. तसेच काही मित्रमंडळी सुद्धा तिथे उपस्थित होती. मी सगळ्यांसोबत फोटो काढले. पण, कोंकणासोबतच फोटो क्लिक केल्यानंतर त्याची चर्चा झाली. माझ्या मनात तसं काहीच नव्हतं. माझी कोणाबद्दल तक्रार देखील नाही. पण, लवकरच मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नक्कीच बोलेन. " असा खुलासा अभिनेत्याने केला.
अमोल पराशर हा अलिकडेच ग्राम चिकित्सालय सीरिजमुळे चर्चेत आला होता. या वेबसीरिजमध्ये अमोल पराशर, विनय पाठक यांची प्रमुख भूमिका आहेत. या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली.