Join us

अक्षय कुमारची राजकारणात एन्ट्री होणार? अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाला "भविष्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 18:38 IST

अनेकदा खिलाडी कुमारला राजकारणात येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हादेखील त्याने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली होती.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मिशन रानीगंज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पश्चिम बंगालमधील सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटात अक्षयने रियल लाइफ हिरो जसवंत गिल यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने राजकारणात येण्याबाबत भाष्य केलं. 

अक्षय कुमारने नुकतीच 'इंडिया टुडे'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला राजकारणात एन्ट्री घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर खिलाडी कुमारने स्पष्ट शब्दांत त्याची भूमिका मांडली. तो म्हणाला, "नाही. मी राजकारणात एन्ट्री घेणार नाही. भविष्यात काय होईल, याबाबत मला कल्पना नाही. पण, सध्या तरी मी राजकारणात सक्रिय होण्याचा विचार करत नाहीये. मी असे चित्रपट करत आहे, कारण सिनेमाच्या माध्यमातून चांगले विषय लोकांपर्यंत पोहचावेत, असं मला वाटतं. केसरी, सम्राट पृथ्वीराजसारख्या चित्रपटांतून आपल्या देशात काय घडलंय हे दाखवण्याचं सुंदर व्यासपीठ देवाने मला दिलं आहे." 

याआधीही अनेकदा खिलाडी कुमारला राजकारणात येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हादेखील त्याने राजकारणात येणार नसल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, 'मिशन रानीगंज' हा एक सत्य घटनेवर आधारित असलेला सिनेमा आहे.पश्चिम बंगालमधील रानीगंज येथे कोळशाच्या खाणीत ६५ खाणकाम करणारे लोक अडकले होते. जसवंत गिल यांनी या ६५ लोकांचे प्राण वाचवले होते. तेव्हापासून ते कॅप्सूल गिल या नावाने ओळखले जाऊ लागले. या चित्रपटात अक्षयबरोबर परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे.  

टॅग्स :अक्षय कुमारराजकारणसेलिब्रिटी