Shaitaan Movie Sequal: बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगणचा (Ajay Devgan) 'शैतान' हा चित्रपट ८ मार्च २०२४ सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अनेक विक्रम रचले. या चित्रपटामध्ये अजय देवगणसहआर.माधवनची जोडी एकत्र पाहायला मिळाली. काळी जादू, वशीकरण यावर आधारित असलेला हॉरर आणि सस्पेंन्स थ्रिलर ‘शैतान’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. शैतानच्या पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादानंतर लवकरच या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित ‘शैतान’चे कथानक आणि स्टारकास्टचा अप्रतिम अभिनय सर्वांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. सध्या शैतान चित्रपटाच्या आगामी भागाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. शैताच्या सीक्वलमध्ये अजय देवगण, आर माधवन, ज्योतिका आणि जानकी बोडीवाला यांच्यासह आणखी नवे चेहरे दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर काजोलच्या आगामी 'मॉं' या चित्रपटाच्या रिलीजनंतर 'शैतान २' ची अधिकृत घोषणा मोठ्या पडद्यावर केली जाऊ शकते, अशी माहिती मिळते आहे. दरम्यान, याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
'शैतान'च्या यशानंतर अजय 'शैतान-२'वर काम करत आहे. विकास बहल हेच या सीक्वलचं दिग्दर्शन करणार असल्याचं कळतंय. रोहित शेट्टीसोबत 'गोलमाल ५'चं शूट पूर्ण केल्यानंतर अजय देवगण २०२६ मध्ये 'शैतान २' चे शूटिंग सुरू करू शकतो. या चित्रपटात काजोलचा कॅमिओ असण्याची शक्यताही आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांची योजना आहे.