Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'त्यांनी इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम केलं पण....'; धर्मेद्र यांचा लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड घेतांना बॉबी देओल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 09:15 IST

Bobby deol: बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जावेद अख्तर, रमेश सिप्पी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार बॉबी देओल याने स्वीकारला.

कलाविश्वात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांची कायमच दखल घेतली जाते. त्यामुळे या कलाकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानितही केलं जातं. नुकताच इंडस्ट्रीतील लोकप्रिय आणि मानाचा असलेला चेतक स्क्रीन अवॉर्ड्स सोहळा पार पडला. बऱ्याच वर्षानंतर हा पुरस्कार सोहळा पुन्हा रंगल्यामुळे या कार्यक्रमाची कलाविश्वात विशेष चर्चा रंगली. या पुरस्कार सोहळ्यामध्ये दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अभिनेता बॉबी देओल याने स्वीकारला. मात्र, पुरस्कार स्वीकारतांना तो प्रचंड भावूक झाला आणि त्याच्या अश्रुचे बांध फुटले.

बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जावेद अख्तर, रमेश सिप्पी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार बॉबी देओल याने स्वीकारला. इतकंच नाही तर, आज अशा पद्धतीने पुरस्कार स्वीकारायची वेळ येईल, असं वाटलंही नव्हतं, असं म्हणत बॉबीने त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

नेमकं काय म्हणाला बॉबी देओल?

''इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात आज मला माझ्या वडिलांप्रतीचं प्रेम स्पष्टपणे दिसून येतंय. माझ्या वडिलांनी त्यांच्या कामातून आणि इन्स्टाग्राम रिल्समधून प्रत्येकाची मनं जिंकली. इतरांनी खूश रहावं असं त्यांना कायम वाटायचं. देवाने आपल्या सगळ्यांना आयुष्यात खूप काही दिलंय असं ते कायम म्हणायचे. आपल्या प्रत्येकामध्ये एक खास गोष्ट असते आणि जर तिच्यावर विश्वास ठेवला तर आपण काहीही सहज मिळवू शकतो, असंही ते म्हणत रहायचे,'' असं बॉबी म्हणाला.

पुढे तो म्हणतो, ''अशा पद्धतीने आज मला इथे यावं लागेल याचा कधी विचारही मी केला नव्हता. त्यांनी इंडस्ट्रीत इतकी वर्ष काम केलं. चांगले-वाईट दोन्ही प्रकारचे दिवस पाहिले. पण, कधी हार मानली नाही. मी कधीही कुठे गेलो की लोकांकडून मला खूप प्रेम मिळतं. आणि, हे सगळं माझ्या वडिलांमुळेच शक्य झालंय. त्यांनीच लोकांच्या मनात आम्हाला स्थान मिळवून दिलंय. लोक त्यांच्यावर इतकं प्रेम करायचे की, त्या सगळ्यांनी आम्हाला सुद्धा सहज आपलंसं केलं. आज इथे उभं राहतांना मला असं वाटतंय की, मी घरी गेल्यावर त्यांना सांगेन, पप्पा, तुम्ही येऊ शकला नाहीत. त्यामुळे मग मीच तुमचा पुरस्कार घेऊन आलो.''

कधी वाटलंच नाही अशीही वेळ येईल

''अशा पद्धतीने मला इथे यावं लागेल याचा कधीही विचारही मी केला नव्हता.पण, शेवटी एकच सांगेन, मी देवाचे आभार मानतो आणि स्वत: ला खूप भाग्यवानही समजतो कारण, मी त्यांच्या पोटी माझा जन्म झाला. मनापासून धन्यवाद पप्पा. ''

दरम्यान, बॉबी देओल हा पुरस्कार स्वीकारत असतांना बॅकग्राऊंडला धर्मेंद्र यांचे काही आयकॉनिक सीन्स प्ले करण्यात आले होते. तसंच अमिताभ बच्चन यांनी सुद्धा याला व्हॉइस ओव्हर दिला होता. धर्मेंद्र यांचं मागील वर्षी २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यावेळी ते ८९ वर्षांचे होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bobby Deol emotional accepting Dharmendra's Lifetime Achievement Award: A tribute.

Web Summary : Bobby Deol tearfully accepted Dharmendra's posthumous Lifetime Achievement Award at the Chetak Screen Awards. He spoke of his father's love for people, his positive outlook, and the impact he had on his family's life and career. Bobby expressed gratitude for being Dharmendra's son.
टॅग्स :बॉलिवूडधमेंद्रबॉबी देओलसेलिब्रिटीदेवेंद्र फडणवीसजावेद अख्तर