Join us
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Special : ... म्हणून तुटले मिथुन चक्रवर्ती यांचे पहिले लग्न! पहिली पत्नी हेलेना आता दिसते अशी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 08:00 IST

एकेकाळी बॉलिवूड प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. पण रिल लाईफपेक्षा त्यांची रिअल लाईफ अधिक चर्चेत राहिली.

ठळक मुद्दे1980 मध्ये हेलेनाले मिथुनसोबत लग्न केल्याचे मीडियासमोर मान्य केले. मिथुन यांनीही याचा इन्कार केला नाही. पण यानंतर लवकरच दोघांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली.

बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचा आज (16 जून)वाढदिवस.  16 जून 1952 रोजी  जन्मलेल्या मिथुन दा यांचे खरे नाव फार कमी लोकांना ठाऊक असेल. होय, गौरांग चक्रवर्ती हे त्यांचे खरे नाव. एकेकाळी बॉलिवूड प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. पण रिल लाईफपेक्षा त्यांची रिअल लाईफ अधिक चर्चेत राहिली. श्रीदेवी आणि मिथुन यांच्या लव्ह लाईफचे किस्से सगळ्यांनाच ठाऊक आहेत. मिथुन यांनी श्रीदेवींशी गुपचूप लग्न केले होते, असे म्हटले जाते. पण श्रीदेवींआधी मिथुनदांनी दोन लग्ने केली होती. होय, मिथुनदांच्या पत्नी योगिता बाली यांच्याविषयी आपण सगळेच जाणतो. 1979 मध्ये मिथुन यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न केले होते. आजही दोघे सोबत आहेत. पण योगिता बाली यांच्याआधी मिथुन यांची पहिली पत्नीही होती. तिचे नाव आहे हेलेना ल्यूक.

मिथून यांची पहिली पत्नी  हेलेना  ही सुद्धा अभिनेत्री होती.  सत्तरीच्या दशकात हेलेना हे फॅशन वर्ल्डमध्ये प्रसिद्ध असे नाव होते. 1980 साली ‘जुदाई’ या चित्रपटात तिने अभिनयही केला होता.  यानंतर ‘साथ  साथ’ आणि ‘एक नया रिश्ता’ चित्रपटातही ती झळकली. पण याऊपरही हेलेना फार काळ बॉलिवूडमध्ये टिकू शकली नाही.

मिथुन यांच्या आयुष्यात हेलेनाची एन्ट्री झाली, याला कारण होते अभिनेत्री सारीका. सारीकासोबत मिथुन यांचे अफेअर होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. या  ब्रेकअपनंतर मिथुन यांना नवा आधार हवा होता. याचदरम्यान त्यांची ओळख हेलेनासोबत झाली. मिथुन यांचे सारीकाशी ब्रेकअप झाले होते आणि हेलेनाचे जावेद खानसोबत. याच काळात दोघेही एकमेकांजवळ आलेत.  

 हेलेनाला पाहताच मिथुन तिच्या प्रेमात पडले होते. मिथुन हेलेनासाठी अक्षरश: वेडे झाले होते. पण हेलेना मिथुन यांच्याइतकी वेडी झाली नव्हती. एका मुलाखतीत हेलेना यांनी सांगितले होते की, मिथुन सकाळी ६ वाजतापासून तर रात्री झोपेपर्यंत मला लग्नासाठी विचारत. ते रोज मला भेटत. अखेर त्यांनी मला स्वत:च्या प्रेमात पडायला भाग पाडले आणि 1979 मध्ये आम्ही कुणाला कळू न देता लग्न केले. त्यावेळी हेलेना 21 वर्षांची होती आणि मिथुन बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होते. मिथुन व हेलेना यांनी लग्न केले. पण हे लग्न केवळ चार महिने टिकले. कारण लग्नानंतर काहीच दिवसांत मिथुन यांच्या आयुष्यात योगिता बालीची एन्ट्री झाली होती. 

हेलेनाने एका मुलाखतीत याची कबुली दिली होती. ‘मिथुन यांच्या घरी त्यांचे दोन चुलत भाऊ आणि दोन कुत्री होती. लग्नानंतरही सगळे आमच्यासोबत होते. दोन्ही चुलत भाऊ मिथुनचा पैसा खर्च करत. मला ते अजिबात आवडायचे नाही. त्या दोन्ही चुलत भावांनी आमच्यापासून वेगळे राहावे, अशी माझी इच्छा होती. पण मिथुन यांना हे आवडले नाही. माझे दोन्ही भाऊ माझ्यासोबत राहतील. हवे तर तू या घरातून निघून जा, असे त्यांनी मला म्हटले. याचदरम्यान त्यांच्या व योगिता बालीच्या नात्याबद्दलही मला ऐकायला येत होते,’ असे हेलेनाने सांगितले होते.

1980 मध्ये हेलेनाले मिथुनसोबत लग्न केल्याचे मीडियासमोर मान्य केले. मिथुन यांनीही याचा इन्कार केला नाही. पण यानंतर लवकरच दोघांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. घटस्फोटानंतर हेलेनाने मिथुन यांना पोटगीची रक्कम मागितली नाही. पण मी सुद्धा अभिनेत्री बनू शकते, हे त्यांना दाखवायचे होते. लग्न तुटल्यानंतर हेलेनाने काही चित्रपट केलेत. पण तिला यश मिळाले नाही. मीडियाचे मानाल तर हेलेना आता न्यूयॉर्कमध्ये सेटल झाली आहे आणि येथे फ्लाईट अटेंडेंटचे काम करतेय.

टॅग्स :मिथुन चक्रवर्ती