Bigg Boss 19: 'बिग बॉस'चं नवं पर्व नुकतंच सुरू झालं आहे. यंदाच्या पर्वात बॉलिवूडमधील अनेक चेहरे बिग बॉसच्या घरात दिसत आहेत. यातीलच एक म्हणजे बॉलिवूड सिंगर अमाल मलिक. अमालने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अमालच्या बिग बॉस एन्ट्रीवर त्याचा भाऊ आणि सुप्रसिद्ध सिंगर अरमान मलिकने प्रतिक्रिया दिली आहे.
अरमान मलिकला चाहत्याने "अमाल मलिक बिग बॉसमध्ये गेलाय. यावर तुझी प्रतिक्रिया काय आहे?" असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला अरमान मलिकने त्याच्या X अकाऊंटवरुन उत्तर दिलं आहे. "तो शो त्याच्यासाठी नाही. पण आता अमाल भाऊला कोण समजावणार...बोर्डिंग स्कूल आहे समजून थोडे दिवस मस्ती करून परत घरी येऊ दे. खूप सारी गाणी पेंडिंग आहेत", असा रिप्लाय अरमान मलिकने दिला आहे.
दरम्यान, 'बिग बॉस'च्या घरात अमाल मलिकला पाहून सलमान खानही आश्चर्यचकित झाला होता. अमाल मलिक हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध सिंगर अरमान मलिकचा भाऊ आणि अनु मलिकचा भाचा आहे. भाऊ आणि काकाप्रमाणे अमालला स्टारडम मिळवता आलं नाही. पण, त्याने अनेक बॉलिवूड सिनेमांमधली गाणी गायली आहेत. चले आना, ओ खुदा, लडकी ब्युटिफूल कर गयी छूल, बेसब्रिया ही त्याची गाणी हिट ठरली आहेत.