Join us

प्रेक्षकांना आवडतेय राजकुमार-वामिकाची जोडी! 'भूलचूक माफ' सिनेमाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 10:54 IST

'भूलचूक माफ' सिनेमाने दोन दिवसांमध्ये किती कमाई केली? जाणून घ्या एका क्लिकवर

राजकुमार राव आणि वामीका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'भूलचूक माफ' या चित्रपटाची चांगलीच चर्चा होती. हा चित्रपट २३ मे रोजी भारतभर रिलीज झाला. चित्रपट रिलीजआधीपासूनच चर्चेत असल्याने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवसापासूनच  'भूलचूक माफ'  सिनेमा पाहायला प्रेक्षक गर्दी करत आहेत. इतकंच नव्हे तर राजकुमार राव आणि वामिका गब्बी ही नवी जोडी प्रेक्षकांना आवडलेली दिसतेय. दोन दिवसात सिनेमाने किती पैसे कमावले, जाणून घ्या

 'भूलचूक माफ' सिनेमाची दोन दिवसांची कमाई

 'भूलचूक माफ' या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७ कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी ९ कोटी रुपये कमावले आहेत. ज्यामुळे या चित्रपटाची एकूण कमाई १६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याच चित्रपटासमोर सूरज पंचोलीचा 'केसरी वीर' हा चित्रपट रिलीज झाला होता.  'केसरी वीर' या चित्रपटाने पहिल्या दिवशी २५ लाख रुपये आणि दुसऱ्या दिवशी २६ लाख रुपये कमावले, ज्यामुळे 'केसरी वीर'ची एकूण कमाई ५१ लाख रुपयांवर थांबली आहे. एकूणच  'भूलचूक माफ' सिनेमासमोर केसरी वीरची कमाई कमीच म्हणता येईल.

 'भूलचूक माफ' चित्रपटाविषयी

 'भूलचूक माफ' या चित्रपटाचे दिग्दर्शन करण शर्मा यांनी केले असून, निर्मिती मॅडॉक फिल्म्स आणि अ‍ॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज यांनी केली आहे. चित्रपटात सीमा पाहवा, संजय मिश्रा, रघुबीर यादव आणि जाकिर हुसैन यांच्याही भूमिका आहेत. 'भूलचूक माफ'च्या यशामुळे राजकुमार रावच्या कारकिर्दीत आणखी एक यशस्वी चित्रपटाची भर पडली आहे. राजकुमार राव आणि वामिका गब्बीची फ्रेश जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडलेली दिसतेय.

टॅग्स :राजकुमार रावबॉलिवूडबॉक्स ऑफिस कलेक्शन