Join us

प्रसिद्धीसाठी हर्ष लिंबाचियाने केलं भारतीसोबत लग्न; कॉमेडियनने सांगितली सत्य परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 17:33 IST

Bharti singh: भारती लवकरच तिचा 'द इंडियन गेम शो' हा कार्यक्रम तिच्या युट्यूब चॅनेल भारती टीव्ही वर लॉन्च करणार आहे.

ठळक मुद्देहर्षने केवळ प्रसिद्धीसाठीच भारतीसोबत लग्न केलं अशी टीका करणाऱ्यांना तिने उत्तर दिलं आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया लवकरच त्यांच्या एका मोठ्या प्रोजेक्टची घोषणा करणार आहेत. भारती लवकरच तिचा 'द इंडियन गेम शो' हा कार्यक्रम तिच्या युट्यूब चॅनेल भारती टीव्ही वर लॉन्च करणार आहे. त्यामुळे सध्या या जोडीची सोशल मीडियावर चर्चा आहे. भारती तिच्या या शोचं दुबईमध्ये लॉन्चिंग करणार असून यावेळी ५० दिग्गज सेलिब्रिटी या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी या नव्या शोच्या निमित्ताने भारतीने एक मुलाखत दिली होती. यावेळी तिने प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या पर्सनल लाइफमधील काही गोष्टींचाही खुलासा केला. यामध्येच हर्षने केवळ प्रसिद्धीसाठीच भारतीसोबत लग्न केलं अशी टीका करणाऱ्यांना तिने उत्तर दिलं आहे.

"आतापर्यंत आम्हाला ज्यांनी ज्यांनी फोन केले ते सगळेच या शोबद्दल फार उत्साही आहेत. मुळात लहान मुलांचे मजेदार खेळ खेळायला कोणाला आवडणार नाही? ही कलाकार मंडळी ज्या पद्धतीने आम्हाला पाठिंबा देत आहेत, ते पाहून या कलाविश्वात आम्ही खरंच फार चांगले मित्र-मैत्रिणी कमावले याचं समाधान मिळतं', असं भारती म्हणाली. त्यावर 'या कार्यक्रमाचं स्वरुप जरी लहान असलं तरीदेखील प्रोडक्शन आणि अन्य बाबींसाठी प्रचंड पैसे खर्च झाल्याचं', हर्षने सांगितलं.

या कार्यक्रमाविषयी बोलत असताना हर्षने त्याला सहन कराव्या लागत असलेल्या ट्रोलिंगविषयीदेखील काही गोष्टींचा खुलासा केला. 'अनेकदा मी केवळ प्रसिद्धी, पैसा यासाठीच भारतीसोबत लग्न केल्याचं म्हटलं जातं. परंतु, आता मला काहीच फरक पडत नाही'.

"आमच्या दोघांसाठीही ही गोष्ट फारशी महत्त्वाची राहिलेली नाही. आम्ही दोन वेगवेगळ्या स्वतंत्र व्यक्तीही आहोत आणि एक कपलदेखील. पण आम्ही सिक्योर आहोत. ज्यावेळी मी योग्य आहे याची मला खात्री असते त्यावेळी जगातील कोणताही व्यक्ती काहीही बोलता तरीदेखील माझ्या लेखी त्याला काहीही किंमत नसते", असं हर्ष म्हणाला.

"आमचं लग्न म्हणजे एक इक्वेशन आहे असं समजू नका. आमच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला माहित आहे, भारती त्याच ओळी बोलेल ज्या हर्षने लिहिल्या असतील. आम्ही दोघंही एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत. ज्यावेळी आम्ही एकत्र काम करतो त्यावेळी खूप धम्माल करतो. लोकं काय म्हणतात, याचा आम्हाला जराही फरक पडत नाही", असं भारती म्हणाली.

दरम्यान, हर्ष-भारतीचं युट्यूब चॅनेलवर सुरु होणाऱ्या नव्या शोमध्ये कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. यात अली गोनी, जॅस्मीन भसीन, पुनीत पाठक, राघव जुयाल हे कलाकार सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :भारती सिंगटिव्ही कलाकारसेलिब्रिटी