बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे चांगलाच चर्चेत असतो. सलमानचे गेल्या काही वर्षातले चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. 'किसी का भाई किसी की जान', 'सिकंदर' अशा भाईजानच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अशातच सलमानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे पहिले शेड्यूल लडाखमध्ये सुरू झाले आहे. या शूटिंग सेटवरील सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सलमानचा सेटवरील फोटो व्हायरल
‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट २०२० मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटात सलमान खान कर्नल बी. संतोष बाबू यांच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्यांनी गलवान संघर्षात मोठी भूमिका बजावली होती. सलमानने या भूमिकेसाठी मोठी तयारी केल्याचे समजते. सध्या चित्रपटाचे शूटिंग २२ ऑगस्टपासून ३ सप्टेंबरपर्यंत लडाखमध्ये होणार आहे. लडाखमध्ये चित्रपटातील महत्त्वाचे ॲक्शन सीन्स शूट केले जाणार आहेत. दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होत आहे.
‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटात सलमानसोबत चित्रांगदा सिंग, जेन शाह आणि अंकुर भाटिया यांच्यासारखे कलाकारही आहेत. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याच्या बातमीने आणि व्हायरल झालेल्या फोटोंनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. प्रेक्षकांना लवकरच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. अजून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली नाहीये.