Join us

वडिलांसाठी फोटोग्राफर बनला आर्यन खान, बाप-लेकामधील प्रेम पाहून चाहते खुश; VIDEO नं जिंकलं मन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:13 IST

शाहरुख खान आणि आर्यन खान यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Aryan Captures Dad ShahRukh Khan With Paps: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. त्याने लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली पहिली वेब सिरीज "द बॅड्स ऑफ बॉलिवूड" आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. काल रात्री मुंबईत या सिरीजचा भव्य प्रिमिअर आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी संपूर्ण बॉलिवूड एका छताखाली जमलं. हा प्रिमिअर सोहळा एखाद्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यापेक्षा कमी नव्हता. बॉलिवूडचे दिग्गज कलाकार हे शाहरुखचा लेकाच्या या नव्या प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी हजर होते. पण, यावेळी शाहरुख आणि आर्यनच्या एका कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं.

"द बॅड्स ऑफ बॉलिवूड"च्या प्रिमिअरमध्ये शाहरुखसाठी आर्यन खान हा फोटोग्राफर झाल्याचं पाहायला मिळालं. जेव्हा शाहरुख पापाराझींसाठी पोझ देत होता, तेव्हा आर्यनने त्याचे फोटो काढले.  फक्त एक नाही तर आर्यनने वेगवेगळ्या अँगलवरून फोटो काढले.  बाप लेकाचं एकमेकांवर असलेलं प्रेम पाहून चाहते खूश झालेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. यावेळी शाहरुख खान काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कॅज्युअल पण आकर्षक दिसत होता.

"द बॅड्स ऑफ बॉलिवूड" ही सीरीज सात भागांची असून धडाकेबाज आणि मनोरंजक आहे, ज्यात प्रभावी संवाद आणि उत्कंठावर्धक क्षण पाहायला मिळतात. रेड चिलीज एंटरटेनमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने निर्मित केलेली ही सीरीज या वर्षातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या प्रोजेक्ट्सपैकी एक ठरत आहे. विशेष म्हणजे, यात शाहरुख खान आणि रणवीर सिंग सारख्या मोठ्या स्टार्सचे कॅमिओ देखील आहेत. ही बहुप्रतिक्षित सीरिज आज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.

टॅग्स :शाहरुख खानआर्यन खानबॉलिवूडनेटफ्लिक्स