Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनं जिंकली मनं; पापाराझींना पाठवलं खास गिफ्ट, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:32 IST

विराट-अनुष्काने अतिशय सुंदर गिफ्ट हॅम्पर पापराझींना पाठवलं आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma)  फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या बाळाला जन्म दिला. 'अकाय' (Akaay) असं त्याचं नाव ठेवण्यात आलं.  विरुष्काचा मुलगा अकाय कसा दिसतो हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण, विराट आणि अनुष्काने पापाराझींना मुलांचे फोटो पोस्ट करण्यास मनाई केली होती.  पापाराझींनीदेखील गोपनीयतेचा आदर राखत अकायचे फोटो पोस्ट केले नाहीत. यावर विराट-अनुष्काने अतिशय सुंदर गिफ्ट हॅम्पर पापराझींना पाठवलं आहे. 

viralbhayani इंस्टाग्राम अकाउंटवर अनुष्का आणि विराटने दिलेल्या गिफ्ट हॅम्परचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या गिफ्ट हॅम्परमध्ये पापाराझींना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. यात पॉवर बँक, स्मार्ट घड्याळ, पाण्याची बाटली आणि बॅग यासह इतर काही गोष्टी आहेत. यासोबतच अनुष्का-विराटने एक सुंदर नोट पाठवत आभार व्यक्त केले आहेत.  पाठवलेल्या चिठ्ठीत विराट आणि अनुष्काने लिहिलं, 'आमच्या मुलांच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आणि तुमच्या पाठिंब्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत'.

अनुष्काने 15 फेब्रुवारी रोजी अकायला लंडनमध्ये जन्म दिला. डिलीव्हरीच्या आधीपासूनच विराट अनुष्का लंडनमध्येच होते. त्यांना भारतातील लाईमलाईटपासून दूर वेळ घालवायचा होता. एप्रिलमध्ये विराट आणि अनुष्का भारतात परतले होते. भारतात येताच त्यांनी पापाराझींना फोटो क्लिक न करण्याचे आवाहन केलं होतं. 'न्यूज 18' च्या वृत्तानुसार, अनुष्का आणि विराटने पापराझींना विमानतळावर मुलगा अकायचा चेहरा दाखवला होता. तसेच मुलांचे फोटो क्लिक करू नयेत अशी विनंती केली होती. 

टॅग्स :अनुष्का शर्मासेलिब्रिटीविराट कोहलीबॉलिवूड