Join us

‘द कश्मीर फाईल्स’च्या प्रमोशनला कपिल शर्मानं खरंच दिला होता नकार? अनुपम खेर यांनी सांगितलं ‘सत्य’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 14:21 IST

The Kashmir Files: द कश्मीर फाईल्सच्या प्रमोशनच्या वादावर अनुपम खेर यांचा खुलासा, कपिल म्हणाला थँक्यू पाजी

The Kashmir Files:  ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. सोबत या चित्रपटाच्या निमित्ताने रोज नवी वक्तव्ये आणि वादांची मालिकाही सुरू आहे.   काही दिवसांपूर्वी सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  यांनी ‘कपिल शर्मा शो’ विरोधात नाराजी व्यक्त करणारं ट्विट केलं होतं. ‘कपिल शर्मानं (Kapil Sharma) आपल्या सिनेमाचं प्रमोशन करायला नकार दिला. सिनेमात कोणतेही मोठे कलाकार नाहीत, असं कारण देत कपिलने प्रमोशनसाठी बोलावलं नाही, ’असा आरोप विवेक अग्निहोत्री यांनी केला होता. यानंतर कपिल शर्मा सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता.

नेटकरी कपिलवर इतके भडकले होते की त्यांनी सोशल मीडियावर कपिलच्या शोला बॉयकॉट करण्याची मोहिमच राबवली होती. यावर कपिलनं  स्पष्टिकरण देत, असं काहीच झालेलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आता या संपूर्ण प्रकरणावर ‘द कश्मीर फाईल्स’मधील अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण या प्रकरणावर चुप्पी तोडत नेमकं काय झालं होतं, हे त्यांनी सांगितलं आहे. ‘टाईम्स नाऊ’ या चॅनलला मुलाखतीत अनुपम खेर या वादावर बोलले.

काय म्हणाले अनुपम खेर...अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘द कश्मीर फाईल्स’चं प्रमोशन करण्याचं निमंत्रण मला दोन महिने आधीच आलं होतं. मी हरमनला, जो माझा मॅनेजर आहे, त्याच्याशी यावर बोललो होतो. ‘द कश्मीर फाईल्स’ खूप गंभीर सिनेमा आहे. त्यामुळे मी कपिल शर्मामध्ये याचं प्रमोशन नाही करू शकतं, असं मी हरमनला म्हणालो होतो.   सिनेमाचा गंभीर विषय पाहता ‘कपिल शर्मा शो’मध्ये आपण सिनेमाचं प्रमोशन करु नये, हा माझा विचार होता. मी त्या शोमध्ये याआधी गेलो आहे. तो एक विनोदी शो आहे. माझ्यामते, ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमाच्या निमित्तानं विनोद रंगवणं योग्य वाटलं नसतं. कपिलचा शो चांगलाच आहे, पण एका अतिसंवेदनशील, गंभीर विषयाला वाहिलेला सिनेमा असतो, तेव्हा तिथे नं गेलेलं योग्य असं मला वाटलं आणि मी शो च्या टीमला नकार कळवला होता. कपिलच्या मनात आमच्या सिनेमाबद्दल कुठलीही चुकीची भावना आहे, असं मला वाटतं नाही, असं अनुपम खेर म्हणाले.

कपिलनं मानले आभार...

 अनुपम खेर यांच्या या खुलाशानंतर कपिल शर्माने अनुपम खेर यांचे धन्यवाद मानले आहेत. कारण गेली अनेक दिवस या प्रकरणावरून कपिलच्या विरोधात वातावरण तापलं होतं. कपिलने अनुपम खेर यांच्या मुलाखतीची क्लिप शेअर करत त्यांचे  आभार व्यक्त केले आहेत. ‘आभारी आहे अनुपम पाजी. तुम्ही माझ्यावरच्या खोट्या आरोपांना उत्तर दिलंत.   त्या सगळ्या मित्रांचेदेखील आभार ज्यांनी सत्य समजून न घेता मला प्रेम दिलं? आनंदी रहा,हसत रहा,’ असं ट्विट त्यानं केलं आहे.

काय आहे प्रकरण

काही दिवसांपूर्वी ‘द कश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून द कपिल शर्मा शोमध्ये त्यांचा सिनेमा   प्रमोट न करण्यात आल्याचा आरोप केला होता. 

‘ कपिल शर्मा शोच्या टीमकडे आम्ही प्रमोशनसाठी विचारलं. पण त्यांनी नकार दिला.  त्यांनी आम्हाला या शोमध्ये बोलवलं नाही. कारण आमच्या चित्रपटामध्ये कोणताही मोठा स्टार नाही, असं एका चाहत्याच्या पोस्टवर रिप्लाय देताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं होतं.  कपिलनं त्याच्या शोमध्ये कोणाला आमंत्रण दिलं पाहिजे, हे मी ठरवू शकत नाही. तो त्याचा आणि कार्यक्रमाच्या निर्मात्यांचा निर्णय आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. यानंतर सोशल मीडियावर कपिल ट्रोल झाला होता.

 

टॅग्स :अनुपम खेरकपिल शर्मा द कपिल शर्मा शोसिनेमाद काश्मीर फाइल्स