ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा गेल्या महिन्यात 'तन्वी: द ग्रेट' सिनेमा आला होता. त्यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. हा सिनेमा त्यांच्यासाठी अत्यंत खास होता. मात्र त्याच दिवशी 'सैयारा' सिनेमाही प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने तरुणाईला अक्षरश: वेड लावलं होतं. त्यामुळे अनुपम खेर यांचा 'तन्वी द ग्रेट' झाकोळला गेला. आता नुकतंच अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'स्क्रीन'ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, "मी या सिनेमावर ४ वर्ष काम केलं. एक वर्ष लिखाण, एक वर्ष संगीतावर काम केलं. मी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. यशराजच्या 'सैयारा' सिनेमाच्या रिलीज दिवशीच आम्ही तन्वी: द ग्रेट रिलीज केला होता. पण आमचा सिनेमा काढून टाकण्यात आला. हे खूपच निराशाजनक होतं. मला खूप वाईट वाटलं. फक्त माझ्यासाठीच नाही तर नवीन अभिनेत्री जिला मी माझ्याच फिल्म स्कूलमधून निवडलं होतं आणि सुमारे २०० लोकांसाठीही वाईट वाटलं ज्यांनी या सिनेमासाठी काम केलं होतं."
ते पुढे खुलासा करत म्हणाले की सिनेमाच्या फायनान्सरनेही रिलीजच्या एक महिना आधी काढता पाय घेतला. यामुळे मी मित्रांकडून पैसे घेऊन खर्च कव्हर केला. सैयारा मुळे तन्वी सिनेमा झाकोळला गेला. कारण लोकांना एक रोमँटिक लव्हस्टोरी पाहायची होती जे साहजिकही आहे. बऱ्याच काळानंतर एक फ्रेश, नवीन लव्हस्टोरी आली होती. आपल्याकडची सिस्टीमही अशी आहे की तुम्ही सिनेमा ४०० थिएटर्समध्ये रिलीज केला आणि दुसरा सिनेमा चांगला चालत असेल तर ते तुमचा सिनेमा काढून टाकतील. त्यामुळे सिनेमा पडला आणि हे माझ्या मनाला खूप लागलं."