दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडला. मुंबईतील लालबागमधील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजाचं अनेक सेलिब्रिटींनी दर्शन घेतलं. लालबागचा राजावर भक्तांची मनोभावे श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी राजाला कोट्यवधींचं दान मिळतं. यंदाही लालबागच्या राजाला भाविकांनी भरभरुन दान दिलं आहे. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचंही नाव समोर आलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी लालबागचा राजाला लाखोंचं दान दिलं आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन राजाच्या दरबारातून एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये लालबागचा राजा मंडळाचे सेक्रेटरी सुधीर साळवी यांच्या हातात एक चेक दिसत आहे. हा चेक अमिताभ बच्चन यांनी पाठवल्याचं म्हटलं गेलं आहे. यानुसार, अमिताभ बच्चन यांनी लालबागचा राजाला तब्बल ११ लाख रुपयांचं दान दिलं आहे.
पण, लालबागच्या राजाच्या चरणी ११ लाख रुपयांचं दान दिल्याने नेटकऱ्यांनी नाराजी दर्शविली आहे. अनेकांनी विरल भय्यानीच्या या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. "पंजाबला मदत केली असती तर जास्त आनंद झाला असता", "पुरामुळे नुकसान झालेल्या ५०० कुटुंबाना मदत करा", "जिथे गरज आहे तिथे पैसे डोनेट करा", अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.