Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अमिताभ बच्चन आमच्यासोबत एकत्र जेवायचे नाहीत..."; सुनील शेट्टीचा खुलासा, काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 13:41 IST

सुनील शेट्टीने बिग बींविषयी हा खुलासा केला. जो वाचून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय घडलं होतं?

बॉलिवूडचा 'अण्णा' म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टी हा त्याच्या सिनेमांमुळे आणि विविध भूमिकांमुळे चांगलाच चर्चेत असतो. सुनील शेट्टी आणि अमिताभ बच्चन यांनी 'काँटे', 'शूटआऊट अॅट लोखंडवाला' या सिनेमांमध्ये काम केलंय. काही महिन्यांपूर्वी सुनील शेट्टीने बिग बींविषयी एक खास किस्सा सांगितला होता. जो ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या. काय म्हणाला अभिनेता? जाणून घ्या

अमिताभ बच्चन आमच्यासोबत जेवायचे नाहीत

सुनील शेट्टीने २००२ साली आलेल्या संजय गुप्ता दिग्दर्शित 'कांटे' (Kaante) या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगच्या दिवसांची आठवण सांगितली. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, लकी अली आणि महेश मांजरेकर यांसारखे अनेक मोठे कलाकार होते. या चित्रपटाचे शूटिंग अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे झाले होते.

सुनील शेट्टी म्हणाला, "माझं आणि अमिताभ बच्चन यांचं नातं खूप खास आहे. माझ्यासाठी ते नेहमीच आयडॉल राहिले आहेत. ते केवळ पडद्यावर जसे दिसतात, म्हणूनच नव्हे, तर 'कांटे'च्या शूटिंगदरम्यान लॉस एंजेलिसमध्ये मी बिग बींविषयी जे पाहिलं, त्यामुळे त्यांच्याबद्दलचा माझा आदर आणखी वाढला."

सुनील शेट्टी म्हणाला की, 'कांटे'च्या सेटवर दररोज दुपारी सर्व कलाकार एकत्र लंच करायचे. सेटवर विविध पदार्थांची व्यवस्था केलेली असायची आणि सर्व टीम एकत्र जेवण करायची. मात्र, अमिताभ बच्चन कायम आमच्यासोबत जेवण्यास टाळाटाळ करायचे. आम्हाला वाटायचं की, त्यांना त्यांच्या व्हॅनमध्ये बसून आराम करायचा असेल म्हणून ते आमच्यासोबत जेवत नाहीत. पण एक दिवस संजय दत्त आणि मी हट्टाने त्यांच्या व्हॅनमध्ये गेलो."

व्हॅनमध्ये गेल्यावर सुनील शेट्टी आणि संजय दत्त यांना जे दृश्य दिसले, त्याने त्यांच्या मनात अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा आदर दहा पटीने वाढवला. सुनील शेट्टीने सांगितलं की, "आम्ही त्यांच्या व्हॅनमध्ये गेलो तेव्हा तेथे एका डॉक्टरकडून बिग बी फिजिओथेरपी करून घेत होते. त्यांच्या खांद्यामध्ये खूप वेदना होत्या, त्यांची मान आखडली होती. त्यामुळेच दुपारच्या लंच ब्रेकच्या वेळेत, ते कोणाला न सांगता, पुढील काही तास शूटिंग करता यावं यासाठी व्हॅनमध्ये जाऊन उपचार करून घेत होते. त्यांनी आम्हाला कधीही याबद्दल सांगितलं नव्हतं. आम्हाला हे कळाल्यावर मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम खूप वाढला," असं सुनील शेट्टीने नमूद केलं.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Suniel Shetty reveals why Amitabh Bachchan didn't dine with them.

Web Summary : Suniel Shetty shared that Amitabh Bachchan underwent physiotherapy during lunch breaks on the set of 'Kaante' due to severe shoulder pain, instead of joining the team for meals. This act increased Shetty's respect for Bachchan.
टॅग्स :सुनील शेट्टीअमिताभ बच्चनटेलिव्हिजनबॉलिवूडटिव्ही कलाकार