Join us

 अक्षय कुमारला दुखापत, तरीही पूर्ण केले शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 12:41 IST

अक्षय कुमार सेटवर जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. मात्र याऊपरही त्याने शूटींग न थांबवता काम सुरू ठेवले.

ठळक मुद्दे27 मार्च 2020 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात अक्षय कुमार नेहमीप्रमाणे अनेक थरारक स्टंट करताना दिसून येणार आहे.  

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार इंडस्ट्रीचा सर्वाधिक फिट हिरो आहे. 52व्या वर्षीही अक्षय सूर्य उगवताच वर्कआऊट सुरू करतो, यावरून त्याच्या फिटनेसचा अंदाज यावा. वर्षभरात अक्षयचे सर्वाधिक सिनेमे रिलीज होतात. सध्या अक्षय मुंबईत त्याचा आगामी सिनेमा ‘सूर्यवंशी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाची शूटिंग सुरु असतानाच अक्षय कुमार सेटवर जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. मात्र याऊपरही त्याने शूटींग न थांबवता काम सुरू ठेवले.

 मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सूर्यवंशी’च्या एका सीनचे शूटींग सुरु असताना त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. यानंतर फिजिओथेरपिस्टने लगेच त्याच्या हाताला टेप बांधला आणि यानंतर अक्षय पुन्हा शूटींगवर परतला. अक्षयने अलीकडे ‘सूर्यवंशी’च्या सेटवरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्याच्या हातावरचा काळा टेप स्पष्ट दिसतोय. या व्हिडीओत कतरीना कैफ त्याच्यासोबत आहे.

अर्थात अद्याप अक्षय कुमारला दुखापत झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय व कतरीना पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. हा दोघांचा 9 वा एकत्र असा सिनेमा आहे. या दोघांशिवाय रणवीर सिंग व अजय देवगणही या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहेत.सूर्यवंशी सिनेमात एक मोठा भाग हा बँकॉक, मुंबई आणि हैदराबादमध्ये चित्रित करण्यात आला होता. 27 मार्च 2020 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात अक्षय कुमार नेहमीप्रमाणे अनेक थरारक स्टंट करताना दिसून येणार आहे.  

टॅग्स :अक्षय कुमार