पश्चिम बंगालच्या तीन कॉलेजच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये टॉपवर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे नाव पाहून सगळ्यांचे डोके फिरले होते. आता पुन्हा एकदा असाच घोळ समोर आला आहे. सनी लिओनीनंतर एका कॉलेजच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या मेरिट लिस्टमध्ये बॉलिवूड सिंगर नेहा कक्करचे नाव टॉपर म्हणून झळकलेय. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील माणिकचक कॉलेजने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या मेरिट लिस्टमध्ये हा घोळ दिसून आला. माणिकचक कॉलेजच्या वेबसाईटवर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण लिस्टमध्ये टॉपवर नेहा कक्करचे नाव होते. तिचे नाव पाहून सगळीकडे चर्चा सुरु झाली आणि तेव्हा कुठे कॉलेज प्रशासनाला जाग आली.
कॉलेज प्रशासनाने तातडीने ही चूक दुरूस्त करत नवीन यादी जाहीर केली. दरम्यान यासंदर्भात स्थानिक पोलीस स्टेशन आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार केली आहे, असे माणिकचक कॉलेज प्राचार्य अनिरुद्ध चक्रवर्ती यांनी सांगितले. काही खोडकर वृत्तीच्या लोकांनी केलेले हे कृत्य निंदनीय आहे. मेरिट लिस्टमध्ये अशाप्रकारची नावं टाकून उच्च शिक्षण प्रणाली किंवा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे अनिरूद्ध चक्रवर्ती यावेळी म्हणाले.