लवकरच राम चरण आणि कियारा अडवाणीची भूमिका असलेला 'गेम चेंजर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'गेम चेंजर' निमित्ताने कियारा अडवाणी पहिल्यांदाच साउथ सिनेसृष्टीत काम करतेय. 'गेम चेंजर' सिनेमा काहीच दिवसांमध्ये रिलीज होत असल्याने सध्या सिनेमाचं प्रमोशन जोरात सुरु आहे. अशातच 'गेम चेंजर'च्या प्रमोशनची पोस्ट टाकताना कियारा अडवाणीकडून एक चूक घडल्याने ट्रोलर्सने तिच्यावर निशाणा साधलाय.
कियारा अडवाणीने काय चूक केली?
झालं असं की, कियाराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये कियाराने जानी मास्टरचा उल्लेख केला होता. राम चरणसोबत कियाराने 'गेम चेंजर' सिनेमातील 'धोप' गाण्यावर परफॉर्मन्स दिला होता. या गाण्याच्या कोरीओग्राफीचं कौतुक करताना तिने जानी मास्टरचा उल्लेख केला. सध्या जानी मास्टरवर लैंगिक शोषणाचे विविध आरोप असून त्याला सप्टेंबरमध्ये अटकही करण्यात आली होती. त्यामुळे कियारावर ट्रोलर्सने निशाणा साधला.
पुढे कियाराने चूक सुधारली
ट्रोलर्सने निशाणा साधताच कियाराने तिची पोस्ट ए़डिट करुन त्यातून जानी मास्टरचा उल्लेख काढून टाकला. २०२४ मध्ये पॉस्को कायद्याअंतर्गत जानी मास्टरला पोलिसांनी अटक केली होती. एका २१ वर्षीय महिला कोरीओग्राफरने जानी मास्टरवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. त्यामुळे कियाराने पोस्टमध्ये जानी मास्टरचा उल्लेख केल्याने नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवली. दरम्यान कियाराचा राम चरणसोबतचा 'गेम चेंजर' सिनेमा १० जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे.