सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि ज्येष्ठ अभिनेते टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची बातमी समोर येतेय. टीकू यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. टीकू यांनी अनेक कॉमेडी शो आणि सिनेमा-मालिकांमध्ये काम केलंय. टीकू शेवटी आपल्याला २०२४ साली आलेल्या 'विकी-विद्या का वो वाला व्हिडीओ' सिनेमात दिसले होते. (actor Tiku Talsania suffers heart attack immediately admitted to hospital)
ज्येष्ठ अभिनेते टीकू तलसानिया हे ७० वर्षांचे आहेत. त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय याशिवाय त्यांची प्रकृती आता कशी आहे, याविषयी कोणतीही अपडेट समोर आली नाहीये. टीकू यांना आपण 'सर्कस', 'स्पेशल २६', 'फिर हेरा फेरी', 'हंगामा', 'रिश्ते', 'देवदास' अशा सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. टीकू यांची प्रकृती गंभीर असून उपचारानंतर ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी त्यांच्या चाहत्यांना आशा आहे.
टीकू तलसानिया यांच्याविषी
टीकू यांचा जन्म १९५४ साली झाला. त्यांनी १९८४ साली टेलिव्हिजनवर आलेल्या 'ये जो है जिंदगी' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे अनेक मालिका, सिनेमांमधून त्यांनी कॉमिक रोल्स साकारले. याशिवाय गुजराती रंगभूमीवरही त्यांनी काम केलंय. त्यांच्या पत्नीचं नाव दीप्ती असून त्यांना रोहन आणि शिखा ही दोन मुलं आहेत. त्यापैकी शिखा ही अभिनेत्री असून तिने 'वेक अप सिड', 'वीरे दी वेडिंग' अशा सिनेमांमध्ये काम केलंय. याशिवाय 'शांतीत क्रांती' या मराठी वेबसीरिजमध्येही शिखा झळकली होती. टीकू तलसानिया यांच्या हेल्थ अपडेटवर सर्वांचं लक्ष आहे.