गुरुवारी (१६ जानेवारी) एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून चाकूने हल्ला केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला (saif ali khan) मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी पहाटे एका दरोडेखोराने त्याच्या घरात घुसून चाकूने हल्ला केला आहे. त्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सैफवर हल्ला, नेमकं प्रकरण काय?
आज गुरुवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास एक अज्ञात इसम सैफ-करीनाच्या मुंबईतील घरात चोरी करण्याच्या हेतून घरात घुसला होता. पुढे घरातील लोक जागे झाल्यानंतर तो चोर घटनास्थळावरून पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. वांद्रे पोलिसांनी या घटनेसंबंधी FIR नोंदवला असून गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत.
एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने घटनेला दुजोरा दिला आणि सांगितले की, "सैफला सध्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. चोरट्याशी झालेल्या झटापटीत सैफवर चाकूने वार करण्यात आले. त्यामुळे सैफला दुखापत झाली. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. मुंबई गुन्हे शाखा देखील या घटनेचा तपास करत आहे.”
“सैफ अली खानला पहाटे ३.३० वाजता लीलावती (रुग्णालय) येथे आणण्यात आले. सैफच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. आम्ही त्याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करणार आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन यांच्याकडून सैफवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सैफच्या जखमा किती खोल आहेत हे शस्त्रक्रिया झाल्यानंतरच आम्हाला कळेल,” असे लीलावती रुग्णालयाचे सीईओ निरज उत्तमणी यांनी सांगितले.