प्राइम व्हिडीओवर नवा हिंदी ओरिजिनल इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राईम थ्रिलर चित्रपट'स्टोलन'चा एक्सक्लुझिव्ह प्रीमियर होणार आहे. ही करण तेजपाल दिग्दर्शित पहिलीच फीचर फिल्म असून ती जंगल बुक स्टुडिओसाठी गौरव ढींगरा यांनी निर्मित केली आहे. 'स्टोलन'ची कहाणी करण तेजपाल यांनी स्वप्निल सालकार - अगडबम आणि गौरव ढींगरा यांच्यासोबत लिहिली आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
'स्टोलन' फिल्मच्या केंद्रस्थानी आहेत दोन आधुनिक विचारांचे भाऊ, जे ग्रामीण भारतातील एका रेल्वे स्थानकावर एका गरीब महिलेच्या लहान मुलाचं अपहरण होताना पाहतात. नैतिक जबाबदारीने प्रेरित होऊन, एक भाऊ दुसऱ्याला त्या आईची मदत करण्यासाठी आणि त्या मुलाला शोधण्याच्या धोकादायक मोहिमेत सामील होण्यास तयार करतो. या उत्कंठावर्धक आणि भावनिक चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, हरीश खन्ना, मिया मेल्जर, साहिदुर रहमान आणि शुभम यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
'स्टोलन' चित्रपटाला व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं. त्यानंतर चित्रपटाने बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफी आणि अभिनेत्रीचे पुरस्कार पटकावले. जपानमधील स्किप सिटी इंटरनॅशनल डी-सिनेमा फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शकाचे पुरस्कार मिळाले. झ्युरिच फिल्म फेस्टिव्हल कडून विशेष उल्लेख मिळाला. भारतात याचे प्रीमियर जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाले आणि त्यानंतर २८ व्या केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील चित्रपट सादर करण्यात आला. हा चित्रपट ४ जून २०२५ ला प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.