बॉलिवूडमधले तीन खान म्हटलं की नाव येतं ते शाहरुख, सलमान आणि आमिरचं. ९० च्या दशकापासून ते आजपर्यंत हे तीनही खान प्रेक्षकांचं यशस्वी मनोरंजन करत आहेत. सलमान-शाहरुखने एकत्र काम केलं आहे. आमिर-सलमाननेही केलं आहे. मात्र आजपर्यंत हे तिघं एकत्र पडद्यावर झळकलेले नाहीत. त्यांना सिनेमात सोबत पाहण्याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. यावर आमिर खाननेही नुकतंच भाष्य केलं आहे.
आमिर खान (Aamir Khan) नुकताच दुबईतील रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला. यावेळी त्याने सलमान आणि शाहरुखसोबत सिनेमा करण्याची तयारी असल्याचं सांगितलं. आता फक्त चांगल्या स्क्रीप्टची प्रतिक्षा आहे असंही तो म्हणाला. इतकंच नाही तर यासाठी शाहरुख-सलमानचाही होकार आहे हे त्याने सांगितलं.
आमिर म्हणाला, "जवळपास सहा महिन्यांपूर्वी आम्ही तिघं भेटलो होतो. तेव्हा आम्ही या विषयावर चर्चा केली. खरं तर मीच हा विषय काढला होता. जर आपण तिघांनी एकत्र सिनेमा केला नाही तर नक्कीच कोणालाच चांगलं वाटणार नाही असं मी त्यांना म्हणालो. मला वाटतं ते दोघंही सहमत होते. त्यामुळे आता आशा आहे की हे लवकरच सत्यात उतरावं. यासाठी आम्हाला चांगल्या स्क्रीप्टची प्रतिक्षा करावी लागेल."
आमिर खान सध्या 'सितारे जमीन पर' सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. पुढील वर्षी सिनेमा रिलीज होत आहे. तर सलमान खानचा 'सिकंदर' ही येतोय. शाहरुख खान सध्या 'किंग' चं शूट करत आहे.