Pay Per View Business Model Details: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान केवळ आपल्या अभिनयामुळेच नव्हे, तर वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या स्टार्सपैकी एक म्हणूनही ओळखला जातो. सध्या तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्याने आपल्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटासाठी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि जिओ हॉटस्टार अशा ओटीटी प्लॅटफॉर्म्सऐवजी थेट यूट्यूबची (Aamir Khan Sitaare Zameen Par Youtube Release) निवड केली आहे. आमिर खान युट्यूबवर चित्रपट प्रदर्शित करतोय, म्हणजे त्याचं नुकसान होणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर आमिर खान हा 'सितारे जमीन पर' चित्रपट Pay-Per-View मॉडेल अंतर्गत प्रदर्शित करतोय. अशा प्रकारचं मॉडेल भारतात फारसं वापरलं जात नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. नेमकं हे मॉडेल काय आहे, आणि आमिर खान या मॉडेलद्वारे नक्की पैसे कसे कमावणार आहे? चला, जाणून घेऊया आमिर खानचा हा हटके आणि धाडसी बिझनेस प्लॅन.
प्रेक्षकांना 'सितारे जमीन पर' हा युट्यूबवर फुकटात पाहायला मिळणार नाहीये. त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. थिएटरसारखेच हे मॉडेल आहे. ज्याप्रमाणे चित्रपट थिएटरमध्ये तिकीट खरेदी करून पाहिला जातो, त्याचप्रमाणे तुम्हाला युट्यूबवर पैसे खर्च करावे लागतील. आपण थिएटरमध्ये जातो, तिकीट खरेदी करतो आणि चित्रपट पाहतो. इंग्रजीत याला पे-पर-व्ह्यू म्हणतात. हेच मॉडेल त्यानं YouTube वर सुरू केलयं. अभिनेत्याचं 'आमिर खान टॉकीज' चॅनेल आहे. आमिरने सांगितले की,'सितारे जमीन पर'शिवाय, 'लगान', 'दंगल', 'पीपली लाईव्ह', 'जाने तू या जाने ना' आणि 'तारे जमीन पर' असे अनेक चित्रपट त्याच्या या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असतील. चॅनेलवर काही मोफत कंटेंट देखील असेल.
पे-पर-व्ह्यू मॉडेल म्हणजे काय?२९ जुलै रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आमिर खानने स्पष्ट केले की YouTube वरील हा चित्रपट १०० रुपयांमध्ये ४८ तासांसाठी पाहता येणार आहे. एकदा तुम्ही पैसे भरले की, पुढील ४८ तासांमध्ये तुम्ही तो कधीही आणि कितीही वेळा पाहू शकता. मात्र, त्यानंतर पुन्हा पाहण्यासाठी नव्याने १०० रुपये भरावे लागतील. आमिरच्या मते, एका कुटुंबात चार जणांनी एकत्र बसून हा चित्रपट पाहिला, तर प्रति व्यक्ती फक्त २५ रुपये लागतील. त्यामुळे हे थिएटरपेक्षा खूपच स्वस्त ठरेल.
'सितारे जमीन पर' हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी 'आमिर खान टॉकीज' या YouTube चॅनेलवर रिलीज होणार आहे. दरम्यान, 'सितारे जमीन पर' २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २६१ कोटींची कमाई केली आहे.