मुंबई फिरायला येणारे हमखास बांद्रा बँडस्टँड येथे शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मन्नत बाहेर गर्दी करतात. तसचं सलमान खानच्याही (Salman Khan) गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर चाहत्यांची गर्दी असते. अगदी रोजच या दोन्ही सुपरस्टार्सच्या घराबाहेर लोक फोटो काढण्यासाठी उभे असतात. शाहरुखच्या मन्नत या नेमप्लेटसोबतही लोक फोटो काढतात. इतकी या दोघांची क्रेझ आहे. पण आमिर खानच्या (Aamir Khan) घराबाहेर चाहत्यांची कधीच गर्दी नसते. यावर आमिर खाननेच उत्तर दिलं.
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला, "एक दिवस माझ्या घराबाहेर गर्दी जमली होती. कार्टर रोड येथील माझ्या घराचं थोडं काम सुरु होतं म्हणून मी आणि किरण ४ वर्षांसाठी जवळच दुसऱ्या इमारतीत शिफ्ट झालो होतो. त्या इमारतीत जॅकी श्रॉफ राहत होते. एक दिवस मी घरी आलो तेव्हा मी पाहिलं की गेटबाहेर खूप गर्दी आहे. मी मनात म्हटलं, 'वाह, अखेर माझ्यासाठी गर्दी जमली'. मी आनंदाने उतरलो आणि त्यांना फोटो द्यायला लागलो. तर तेव्हा मला कळलं की ही गर्दी जॅकी दांचा मुलगा टायगर श्रॉफसाठी जमली होती. ती गर्दी माझ्यासाठी नव्हती."
आमिर खानची इंडस्ट्रीत 'द परफेक्शनिस्ट' अशी ओळख आहे. नुकताच त्याचा 'सितारे जमीन पर' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 'लाल सिंह चड्डा'च्या अपयशानंतर तीन वर्षांनी आमिर पडद्यावर दिसला. सिनेमाचं अपयश त्याच्या अगदीच जिव्हारी लागलं होतं. तो अभिनय सोडण्याचाही विचार करत होता इतकं त्याला नैराश्य आलं. मात्र आता त्याने दमदार कमबॅक केलं आहे.