Sitaare Zameen Par Youtube Release: आमिर खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 'सितारे जमीन पर' हा सिनेमा गेल्या २० जून रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. थिएटरमध्ये प्रदर्शित होताच या चित्रपटाला भरपूर प्रेम मिळालं. हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहू न शकलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. थिएटरनंतर आता तुम्ही हा चित्रपट टीव्हीवर पाहू शकता. आमिर खान हा चित्रपट यूट्यूबवर प्रदर्शित करतोय. यूट्यूब शिवाय हा चित्रपट इतर कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नाही.
'सितारे जमीन पर' आता येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून जगभरात युट्यूबवर प्रदर्शित होईल. आमिर खानने नुकतीच घोषणा केली की 'सितारे जमीन पर' हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ पासून YouTube Movies On Demand या प्लॅटफॉर्मवर जगभरात प्रदर्शित होणार आहे. भारतात, हा चित्रपट १०० रुपयांना उपलब्ध असेल. तर अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंडोनेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर आणि स्पेनसह ३८ देशांमध्ये तो स्थानिक किंमतीसह उपलब्ध असेल.
युट्यूबवर चित्रपट प्रदर्शित करण्याच्या या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना आमिर खान म्हणाला, "गेल्या १५ वर्षांपासून मी असे काही करायचा प्रयत्न करत होतो, ज्यामुळे जे थिएटरपर्यंत पोहोचू शकत नाहीत तेही सिनेमाचा आनंद घेऊ शकतील". 'सितारे जमीन पर' सिनेमा हा २००७ साली प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या 'तारे जमीन पर' या लोकप्रिय सिनेमाचा सीक्वल आहे. या सिनेमात आमिर आणि जिनिलीया मुख्य भूमिकेत आहेत. तर या सिनेमात आमिर खानसोबत १० नवोदित कलाकारांचा सहभाग आहे.