सिने कलाकारांचे लाखो चाहते आहेत जे त्यांना भेटण्यासाठी किंवा त्यांची एक झलक मिळविण्यासाठी आतुर असतात. पण काही वेडे चाहते आहेत जे आपल्या आवडत्या सेलेब्सला भेटण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. मलायका अरोरा(Malaika Arora)सोबतही असेच काहीसे घडले होते. आपल्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे लोकप्रिय असलेल्या मलायकाच्या चाहत्यांची कमतरता नाही. तिच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी चाहते उत्सुक असतात. एकदा तिची महिला चाहती चक्क तिच्या घरात घुसली होती, तेही कात्री घेऊन.
अलिकडेच, मलायका अरोराने एका मुलाखतीत तिच्या सर्वात क्रेझी चाहतीसोबत आलेला अनुभव शेअर केला. तिने सांगितले की, एक फॅन तिच्या घरात घुसली होती आणि लिव्हिंग रुममध्ये बसून तिची वाट पाहत होती. बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, "मला कल्पना नव्हती. ती फक्त तिथेच बसली होती. ती माझ्याशी बोलायला आली होती, खरे सांगायचे तर मी खूप घाबरले होते."
तिच्या हातातली कात्री पाहून घाबरली मलायका 'छैय्या छैय्या गर्ल' मलायका अरोराने पुढे सांगितले की, ही फॅन महिला होती आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे तिच्या हातात कात्री होती. अभिनेत्री म्हणाली की, "ती तिच्या बॅगेत कात्री किंवा काहीतरी घेऊन बसली होती, जी थोडी भीतीदायक होती. मला काहीतरी गडबड आहे असे वाटले, म्हणून मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. ही खरोखरच माझ्यासाठी सर्वात विलक्षण फॅन मीटिंग होती."
वर्कफ्रंटमलायका अरोरा सध्या रुपेरी पडद्यावर पाहायला मिळत नसली तरी ती अनेकदा तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे प्रसिद्धी मिळवते. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती भले मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसत नसली, तरी ती टीव्ही शो जज करते. आजकाल ती हिप हॉप इंडिया सीझन २ची परिक्षक आहे. याशिवाय तिने झलक दिखला जा, इंडियाज बेस्ट डान्सर आणि इंडियाज गॉट टॅलेंट शोदेखील जज केले आहे.