Join us

"अफेअरच्या चर्चांमुळे माझी बायको सोडून चालली", ७० वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:35 IST

या चर्चांमुळे गोविंद नामदेव यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला असून त्यांची पत्नी त्यांच्यापासून वेगळं राहण्याचा विचार करतेय, असं ते म्हणाले.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव (govind namdev) आणि अभिनेत्री शिवांगी वर्मा (shivangi varma) यांच्यातील डेटिंगच्या चर्चांमुळे सध्या सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी शिवांगीने गोविंद नामदेव यांच्यासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत "प्रेमाला कोणतंही वय नसतं" असं कॅप्शन दिला. यानंतर त्यांच्या नात्याबाबत अफवा जोर धरू लागल्या. गोविंद हे ७० वर्षांचे आहेत तर शिवांगी ३१. या फोटोमुळे आणि अफवांमुळे गोविंद यांना वैयक्तिक आयुष्यात मात्र त्रास सहन करावा लागला, असं दिसतंय.

शिवांगीला खरंच डेट करत आहेत गोविंद?

या फोटोनंतर ज्या अफवा उठल्या त्यावर गोविंद नामदेव यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, हे सर्व त्यांच्या आगामी चित्रपट "गौरिशंकर गोहरगंज वाले" च्या प्रमोशनचा भाग होता. त्यांनी सांगितले की, "चित्रपटातील आमच्या पात्रांमध्ये एक प्रेमकथा आहे, त्याची झलक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे फोटोज पोस्ट करण्यात आले. पण या गोष्टीची कल्पना शिवांगीने गोविंद यांना दिली नाही. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केला, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला."

या प्रकरणावर शिवांगीनेही प्रत्युत्तर दिलं. तिने गोविंद नामदेव यांचं नाव न घेता स्टोरीमध्ये लिहिलं, "वयस्कर लोक वयानुसार सैरभैर होतात." यावरून ती त्या अफवांवर तितक्याच परखडपणे उत्तर देत असल्याचं स्पष्ट झालं. गोविंद नामदेव यांनी नंतर शिवांगीसोबतचा संपर्क तोडला असल्याचंही स्पष्ट केलं. त्यांनी सांगितले की, "अशा प्रकारच्या गोष्टींनी माझ्या कुटुंबावरही परिणाम झाला. मी आणि माझी पत्नी आता वेगळं राहण्याचा विचार करत आहोत. मी यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही." अशाप्रकारे एखादी प्रमोशनल स्ट्रॅटेजी बॉलिवूड कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर कसा परिणाम करते, हेच यातून दिसतं.

टॅग्स :लग्नबॉलिवूड