56 वर्षाचा साऊथ स्टार बबलू पृथ्वीराजनं ( Babloo Prithiveeraj) आपल्यापेक्षा 33 वर्षांनी लहान तरूणीच्या प्रेमात असल्याची बातमी आली आणि सगळीकडे याचीच चर्चा सुरू झाली. आता यावर स्वत: बबलू पृथ्वीराजने मौन सोडलं आहे.IndiaGlitz ला दिलेल्या मुलाखतीत बबलूने 23 वर्षांच्या तरूणीशी नात्यात असल्याची कबुली दिली. यावरून ट्रोल करणाऱ्यांना त्याने खरमरीत उत्तर दिलं. या वयात मी एका तरूण मुलीशी लग्न करत असेल तर त्यात चुकीचं काय? असा सवाल त्याने केला.
पृथ्वीराजच्या लेडीलव्हचं नाव शीतल आहे. तिच्याबद्दल बोलताना तो म्हणाला,‘शीतल खूप समजूदार आहे. तिच्या वयापेक्षा अधिक प्रगल्भ आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिने मला सोबत दिली आहे. शीतलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेऊन मी आनंदात आहे. यात काहीही गैर नाही. कारण एकाकीपण हा एक अभिशाप आहे. मी वयाने मोठा असलो तरी मनाने अद्यापही तरूण आहे. शीतलला माझ्या वयाची कल्पना आहे. तिच्या कुटुंबाला माहित आहे. त्यांना, मला अडचण नाही, मग लोकांना काय अडचण आहे? सिनेमा, म्युझिक, हेल्थ, लाईफस्टाइल सगळ्याबाबतीत माझे व शीतलचे विचार जुळतात. आम्ही गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखतो. ती एक निष्पाप मनाची मुलगी आहे. ती चांगलं जेवणही बनवते. त्यामुळे शीतलसोबत लग्न करण्याचा निर्णय अगदी योग्य निर्णय आहे, असं मी मानतो.’ शीतल व बबलू लवकरच लग्न करणार आहेत. अर्थात अद्याप त्यांनी लग्नाची तारीख जाहिर केलेली नाही.
बबलू आधीच विवाहित आहे. त्याच्या पत्नीचं नाव बीना आहे. 1994 साली बबलू व बीना यांचं लग्न झालं. दोघांना एक मुलगाही आहे. या मुलाचं वय 27 वर्ष आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षांपासून बबलू व त्याची पत्नी बीना यांच्यात बिनसलं होतं. मुलगा ऑटिस्टिक असल्यानं दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि हा वाद विकोपाला पोहोचला. वैवाहिक आयुष्यातील तणाव वाढल्यानं अखेर बबलू व बीना काही वर्षांआधी विभक्त झालेत. आता घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि अशात आता बबलू दुसरं लग्न करणार आहे.
बबलू पृथ्वीराज हा तमिळ सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. अनेक तामिळ चित्रपटांत व मालिकेत त्याने काम केलं आहे. तामिळसोबतच तेलगू व कन्नड चित्रपटांतही त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. बबलू हा निगेटीव्ह भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. बालकलाकार म्हणून करिअर सुरू करणाऱ्या बबलूने Naan Vazhavaippen या चित्रपटातून करिअरला सुरूवात केली. 1980 साली त्याने कमबॅक केलं. खलनायकी भूमिकांनी त्याला विशेष ओळख दिली. आत्तापर्यंत त्याने 100 हून अधिक साऊथ सिनेमांत काम केलं आहे.बबलू पृथ्वीराज हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याची कल्पना येईल. इन्स्टा अकाऊंटवर त्याचे अनेक वर्कआऊट व्हिडिओ, फोटो पाहायला मिळतात.