Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखसाठी गाणं का गात नाही? अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, "स्वाभिमान दुखावतो तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:19 IST

अभिजीत भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत शाहरुखविषयी खदखद व्यक्त केली.

अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. ९० ते २००० च्या दशकात त्यांच्या आवाजाची जादू होती. नुकतीच मुंबईत दुआ लिपाची लाईव्ह कॉन्सर्ट झाली. यामध्ये तिने चाहत्यांना सरप्राईज दिलं. तिच्या Leviating आणि शाहरुखच्या 'बादशाह' सिनेमातलं 'वो लडकी जो' गाण्याचं मॅशअप वाजवलं. यानंतर सगळीकडे किंग खानचीच चर्चा झाली. कोणीही गाण्याचा खरा गायक अभिजीत भट्टाचार्य यांचं नाव घेतलं नाही. आता नुकतंच अभिजीत भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत शाहरुखविषयी खदखद व्यक्त केली.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, "जेव्हा स्वाभिमान दुखावतो तेव्हा तुम्ही म्हणता की बास! खूप झालं. मी त्याच्यासाठी गात नव्हतो तर माझं काम म्हणून गात होतो. पण जेव्हा मी पाहिलं की तो सगळ्यांना श्रेय देतो अगदी सेटवर चहा देणाऱ्यालाही पण गायकाला देत नाही. तेव्हा मला वाटलं की मी याचा आवाज का बनू?"

ते पुढे म्हणाले, "असं काही नाही की शाहरुखसोबत माझं नातं तुटलं. पण आज तो फक्त एक माणूस नाही तर मोठा स्टार आहे. तो आज कुठे पोहोचला आहे याची त्यालाही जाणीव नसेल. मग मी त्याच्याकडून का अपेक्षा करु? मी आजही तोच व्यक्ती आहे आणि स्वत:च्या पद्धतीने पुढे जात आहे. मी त्याच्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठा आहे. माफीची काही गरज नाही. प्रत्येकाचा इगो आहे. मला त्याच्या पाठिंब्याचीही गरज नाही."

अभिजीत भट्टाचार्य यांनी 'बादशाह ओ बादशाह', 'मै अगर सामने', 'तुम्हे जो मैने देखा', 'चुनरी चुनरी', 'झांझरियाँ' अशी अनेक गाणी गायली आहेत. 

टॅग्स :अभिजीत भट्टाचार्यशाहरुख खानबॉलिवूडसंगीत