मुंबई - बॉलीवूडमधील काही प्रमुख कलाकारांनी २०१६ ते २०२१ या कालावधीमध्ये खरेदी केलेल्या काही मालमत्तांची आता विक्री करण्यास सुरुवात केली असून, सध्या वाढलेल्या मालमत्तांच्या किमतींमुळे त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर सरासरी तब्बल ११४ टक्के नफा मिळाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, सुभाष घई यांनी या कालावधीमध्ये ज्या मालमत्ता खरेदी केल्या त्यांची एकत्रित किंमत ५६ कोटी रुपये होती. मात्र, आता जेव्हा त्यांनी या मालमत्तांची विक्री केली, तेव्हा तो एकत्रित व्यवहार १२२ कोटी ४२ लाख रुपये इतका झाला आहे.
अक्षयकुमारचे दोन फ्लॅट ८४ कोटींवरअभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना या दोघांच्या नावावर असलेला वरळी सीफेस परिसरातील फ्लॅट त्यांनी ८० कोटी रुपयांना विकला आहे. याद्वारे ४ कोटी ८० लाखांचे मुद्रांक शुल्क सरकारला मिळाले आहे. त्यांनी बोरिवली येथील अन्य एका फ्लॅटची विक्री ४ कोटी २५ लाख रुपयांना केली आहे. त्यांनी तो २०१७ मध्ये २ कोटी ३८ लाखांना घेतला होता.
सोनाक्षी सिन्हाला मिळाले २२ कोटी रुपयेअभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचा वांद्रे येथील आलिशान फ्लॅट २२ कोटी ५० लाखांना विकला आहे. वांद्र्यातील एका आलिशान इमारतीमध्ये १६ व्या मजल्यावर असलेल्या या फ्लॅटची खरेदी तिने मार्च २०२० मध्ये १४ कोटी रुपयांना केली होती.
अमिताभ बच्चन यांनी ८३ कोटींना विकला फ्लॅटबिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मालकीचा अंधेरी येथील एक आलिशान फ्लॅट ८३ कोटी रुपयांना विकला आहे. या फ्लॅटची खरेदी त्यांनी २०२१ या वर्षी ३१ कोटी रुपयांना केली होती. अंधेरीतील एका आलिशान इमारतीमध्ये २७ आणि २८ या मजल्यावर हा दुहेरी फ्लॅट असून, त्याचे ५१८५ चौरस फूट इतके आकारमान आहे. यासाठी ४ कोटी ९८ लाखांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले.
सुभाष घई यांच्या मालमत्तेला १३ कोटीप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांचा अंधेरी पश्चिमेकडील एक आलिशान फ्लॅट १२ कोटी ८५ लाखाला विकला आहे. त्याची खरेदी त्यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये ८ कोटी ७२ लाखांना केली होती. १४ व्या मजल्यावरील हा फ्लॅटचे क्षेत्रफळ १७६० चौरस फूट आहे.