Jackie Shroof: जॅकी श्रॉफ हे नाव बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. आपल्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. शिवाय नायकापासून खलनायिकी भूमिकाही त्यांनी तितक्याच ताकदीने वठवल्या.दरम्यान, चाहत्यांमध्ये जग्गु दादा म्हणून प्रसिद्ध असणारे जॅकी श्रॉफ त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे देखील चर्चेत असतात. वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर ते आपलं मत मांडताना दिसता. अशातच नुकताच सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
खरंतर, मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस आणखी जटील होत चालली आहे.यावर अजूनही कोणताही ठोस उपाय निघालेला नाही. सर्वसामान्यांसह प्रत्येकाला या समस्येचा सामना करावा लागतो. त्यात जॅकी श्रॉफ यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
या व्हिडिओमध्ये, ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका पाहून त्यांनी निराशा व्यक्त केली. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की जॅकी श्रॉफ त्यांच्या गाडीत बसले आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये अडकलेली गाडी पाहून त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलंय,"जर ॲम्ब्युलन्स अशीच अडकून राहिली, तर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये वेळेत कसं पोहोचवता येईल? तो रस्त्यावरच प्राण सोडेल.खरंतर, ॲम्ब्युलन्ससाठी वेगळा रस्ता बनवायला पाहिजे.शिवाय रस्त्यावर गाड्या चालवणाऱ्यांना ॲम्ब्युलन्ससाठी रस्ता मोकळा करून द्यावा, हे समजलं पाहिजे.पण कोणाला काहीच पडलेलं नाही." अशा म्हणत जॅकी श्रॉफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत अभिनेत्याच्या वक्तव्याचं समर्थन करत आहेत.
जॅकी श्रॉफ यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच ते 'हंटर-२' या सीरिजमध्ये पाहायला मिळाले. तसंच'सिंघम अगेन', 'बेबी जॉन' चित्रपटामुळेही ते चांगलेच चर्चेत होते.