Join us

"स्टारकिड्सच्या पार्टीला जाऊ द्यायचे नाहीत", बॉबी देओलचा वडिलांबाबतीत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:29 IST

आम्ही सामान्य आयुष्य जगलो, पण आता वाटतं... बॉबी देओल काय म्हणाला वाचा

बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांची दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांचीही इंडस्ट्रीत वेगळी ओळख आहे. गेल्या काही वर्षांपासून देओल बंधू चर्चेत आहेत. मधल्या काळातील फ्लॉप करिअरनंतर सनी देओलने 'गदर २'मधून दमदार कमबॅक केलं. तर बॉबीने 'आश्रम' वेबसीरिज आणि नंतर 'अॅनिमल' सारख्या सिनेमातून जबरदस्त कमबॅक केलं. नुकतंच बॉबीने एका मुलाखतीत त्याच्या लहानपणी त्याला स्टारकीड्सच्या बर्थडे पार्टीला जायचीही परवानगी नव्हती असा खुलासा केला.

इन्स्टंट बॉलिवूडशी बातचीत करताना बॉबी देओल म्हणाला, "लहानपणी जेव्हाही कोणा स्टारकिडचा बर्थडे असायचा तेव्हा बाबा मला जायची परवानगी द्यायचे नाहीत. पण आता मी त्यांना विचारतो की तुम्ही असं का केलं? तेव्हा ही खूप मोठी गोष्ट वाटायची. मग सवय झाली त्यामुळे आता मी त्याबद्दल विचार करत नाही. आम्ही भावंडांनी फिल्म इंडस्ट्रीतील लोकांशी बोलू नये, भेटू नये अशीच वडिलांची इच्छा होती. कारण इंडस्ट्रीतील लोक नकली असतात असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांना आम्हाला त्यापासून दूर ठेवायचं होतं."

तो पुढे म्हणाला, "आमच्या घरात फिल्म इंडस्ट्रीसारखं  वातावरण अजिबातच नव्हतं. खूप साधं कुटुंब होतं. आमच्या घरी ना कोणत्या पार्ट्या व्हायच्या आणि ना फिल्मविषयी काही गप्पा व्हायच्या.  आम्ही सामान्य लोकांसारखंच राहायचो. त्यामुळे आम्ही कधीच फिल्म इंडस्ट्रीकडे प्रभावित झालो नाही. बाहेर जेव्हा वडिलांना एवढं प्रेम मिळायचं तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटायचं. मी सेटवर गेलो तर किंवा घराबाहेर गेलो तर जमलेली गर्दी पाहून त्यांना का इतका मान मिळत आहे असा प्रश्न पडायचा."

"हो मी वडिलांबरोबर सिनेमाच्या सेटवर जायचो. शूट पाहण्यासाठी नाही तर चांगलं खायला मिळेल म्हणून जायचो. मला शाळेला दांडी मारायची असायची. सकाळी उठून मी वडिलांना विचारायचो की मीही तुमच्यासोबत येऊ का? ते हो म्हणत मला घेऊन जायचे. मग संध्याकाळी आल्यावर आई ओरडायची. त्याकाळी जर मोबाईल असते तर आईने बाबांना फोन करुन मला शाळेत पाठवायला लावलं असतं."

टॅग्स :बॉबी देओलधमेंद्रबॉलिवूड