Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुमच्या घरातील बिग बॉस कोण?" रितेश देशमुखने सांगूनच टाकलं, म्हणाला- "प्रत्येक घरात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 10:57 IST

'बिग बॉस मराठी ५' होस्ट करत असलेल्या रितेशला त्याच्या घरातील 'बिग बॉस'बद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर रितेशने एका वाक्यात उत्तर देत सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली.

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी ५'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'बिग बॉस मराठी'चा हा नवा सीझन खऱ्या अर्थाने खास असणार आहे. यंदाचं पर्व मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार आहे. नुकतीच 'बिग बॉस मराठी ५'ची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना रितेशने दिलखुलासपणे उत्तरं दिली. 

'बिग बॉस मराठी ५' होस्ट करत असलेल्या रितेशला त्याच्या घरातील 'बिग बॉस'बद्दल प्रश्न विचारण्यात आला. "तुमच्या घरातील बिग बॉस कोण?" असा प्रश्न रितेशला विचारला गेला. यावर रितेशने एका वाक्यात उत्तर देत सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. "केवळ माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्या घरात एकच बिग बॉस असतो...ते म्हणजे त्याची बायको", असं रितेश म्हणाला. 

"बिग बॉस होस्ट करणार हे समजल्यावर जिनिलीयाची रिअॅक्शन काय होती?" असा प्रश्नही रितेशला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, "जिनिलियासोबत सर्वात आधी सगळ्या गोष्टींवर चर्चा करतो. त्यांचं मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्ही दोघे बिग बॉस बघतो. मी बिग बॉसचा फॅन आहे, हे त्यांनादेखील माहित आहे". रितेश आणि जिनिलीया हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. महाराष्ट्राच्या या लाडक्या दादा वहिनीकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. 

दरम्यान, 'बिग बॉस मराठी ५'चा नवा सीझन २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये मानसी नाईक, अंकिता वालावलकर, संजू राठोड, प्रणव रावराणे हे कलाकार दिसण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :रितेश देशमुखबिग बॉस मराठीमराठी अभिनेताजेनेलिया डिसूजा