Join us

'मराठी'वरुन रितेश देशमुखवर टीका करणाऱ्या पुनीतला डीपीनं सुनावलं, म्हणाला 'तुझी लायकी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:22 IST

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता धनंजय पोवारनं पुनीतला सडेतोड शब्दात सुनावलं आहे.

सध्या राज्यात मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरू आहे. राज्यभरात नाहीतर संपूर्ण देशभरात या भाषावादाची झळ पोहोचली आहे. यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत अनेक सिनेकलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक कलाकारांनी महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आलं पाहिजे असं म्हटलंय. यातच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये तो पापाराझींशी मराठीत संवाद साधताना दिसला. या व्हिडीओवरून रीलस्टार आणि 'बिग बॉस ओटीटी' फेम पुनीतने रितेशवर वादग्रस्त टीका केली होती. यावर रितेशची बाजू घेत 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता धनंजय पोवारनं पुनीतला सडेतोड शब्दात सुनावलं आहे.

धनंजय पोवारनं इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो म्हणाला, "या पुनीत सुपरस्टारला अक्कल असली पाहिजे, ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय, त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहीत आहे का? घरच्यांबरोबर आणि आपल्या मुलांबरोबर ते ज्याप्रकारे वागतात, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याकडे एक संस्कारी व्यक्ती म्हणून आम्ही पाहतो. आम्ही त्यांना आदर्श मानतो. शिवाय महाराष्ट्रातीलही बरेच जण त्यांना आदर्श मानतात".

पुढे धनंजय म्हणतो, "पुनीत तू त्यांना कोणत्या थराला जाऊन बोलत आहेस. तुझी लायकी नसताना तू बोलू नकोस. लायकी हा शब्द वापरणं चूक आहे. पण तूझे जे व्हिडीओ बनवतोस, त्यातून तुझे विचार कळतात. त्यामुळे तू त्यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट नको बोलूस". धनंजय पोवारचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, यावर रितेश देशमुख किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. धनंजय पोवारचं नाही तर अनेक कलाकार, चाहत्यांकडून रितेशला जोरदार पाठिंबा मिळताना दिसतोय. 

टॅग्स :रितेश देशमुखबिग बॉस मराठीमराठी अभिनेता