सध्या 'छावा' (chhaava movie) सिनेमा चांगलाच गाजतोय. मॅडॉक फिल्मसने 'छावा'ची निर्मिती केली आहे. 'स्त्री', 'स्त्री २', 'मुंज्या' अशा सिनेमांची निर्मिती करणारी प्रॉडक्शन संस्था 'मॅडॉक फिल्म' सध्या चांगलीच गाजतेय. 'छावा'नंतर मॅडॉक फिल्मने आज त्यांच्या नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. राजकुमार राव आणि वामिका गब्बीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा टीझर आज रिलीज झालाय. 'भूलचुक माफ' (bhoolchuk maaf teaser) असं या सिनेमाचं नाव आहे. सिनेमाचा टीझर बुचकळ्यात टाकणारा आणि हसवणारा आहे.
'भूलचूक माफ' सिनेमाचा टीझर
'भूलचूक माफ'च्या टीझरमध्ये दिसतं की, राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचं एकमेकांवर प्रेम असतं. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. पुढे दोघांच्या घरचे लग्नाची बोलणी करायला एकत्र येतात. लग्नाची तारीखही ठरते. राजकुमारला हळदही लागते. पण दुसऱ्या दिवशी राजकुमार उठतो तेव्हा त्याचं लग्न असूनही त्याच्या घरचे त्याला हळदच लावतात. तिसऱ्या दिवशीही हेच होतं. आता यामागे कारण काय? राजकुमार स्वप्न पाहत असतो का? हळद लागूनही लग्न का होत नाही? या सर्वांची उत्तर 'भूलचूक माफ' रिलीज झाल्यावरच कळतील. सिनेमाचा टीझर आपलं डोकं चक्रावून टाकतो.
कधी रिलीज होणार 'भूलचूक माफ'?
मॅडॉक फिल्मची निर्मिती असलेला 'भूलचूक माफ' सिनेमा १० एप्रिलला सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमात राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांची प्रमुख भूमिका आहे. 'भूलचूक माफ' सिनेमात राजकुमार आणि वामिकासोबत अभिनेत्री सीमा पाहवा झळकत आहेत. दिनेश विजन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. करण शर्मा यांनी या सिनेमाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.